सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलं आहे.

साडेबारा हजार पोलिसांच्या भरतीमुळे पोलीस दलास बळकटी मिळण्यास अधिक मदत होईल. यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला २५ ते ३० लाख अर्ज येण्याची आम्ही अपेक्षा करत आहोत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलीस भरती संदर्भात माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, “मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”.

याआधी पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार यांनी जुलैमध्ये तशी माहिती दिली होती. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती.