येत्या दोन दिवसांत अण्णा हजारे यांचे उपोषण संपले नाही तर तर अण्णांच्या जिवाला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ शकतो असा अहवाल डॉक्टरांनी दिल्याची माहीती माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, हजारे यांचा कोणीही गरसमज करीत नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. आम्ही केजरीवाल यांचे हित पाहणारेच आहोत त्यांनी चळवळीत सहभागी व्हावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सात दिवस उपोषण करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन हजारे यांनी सायंकाळी केले.  हजारे यांची प्रकृती  खालावत चालल्याचा डॉक्टरांचा अहवाल आहे, अण्णा कितीही म्हणत असले की, माझी प्रकृती ठीक आहे तरी वैद्यकिय अहवालाप्रमाणे ते दोन दिवसांनंतर उपोषणास बसू शकतील की नाही याविषयी शंका आहे. त्यासाठी हे विधेयक बुधवापर्यंत दोन्ही सभागृहात मंजूर करावे तसे झाले तर बुधवारी सायंकाळपर्यंत अण्णांचे उपोषण मागे घेता येईल. बुधवापर्यंत हजारे यांच्या प्रकृतीस धोका नाही, असेही त्या म्हणाल्या.
सरकारने सादर केलेल्या मसुदयाचे आम्ही पुरावे सादर केले आहेत. स्थायी समितीचा अहवाल गेल्या वर्षभरापासून संकेतस्थळावर उपलब्ध असून गेल्या अनेक दिवसांपासून हा अहवाल वाचला जात आहे. हा अहवाल सार्वजनिक आहे. त्याची अण्णांनाही कल्पना आहे. सर्व निर्णय अण्णांनीच घेतले आहेत’ असेही त्या म्हणाल्या    
देशाचे पुढील पंतप्रधान राहुल गांधी होवो अथवा नरेंद्र मोदी, जो कोणी या पदावर असेल त्यांच्याकडून देशासाठी लाखो लोकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवली गेली पाहीजे. परंतु सर्वजण केवळ सत्ता आणि पैशांच्या मागे लागले असून त्यामुळेच आज या देशाची दुरवस्था झाली आहे. कुठलाही पक्ष देशाला भवितव्य देणार नसून केवळ जनआंदोलनच ते देऊ शकते,  असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना केला. पंतप्रधानाने आपल्या पदाप्रमाणे व्यवहार केला पाहिजे दुखी पीडितांचा विचार केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.