जयंत पाटील यांचा इशारा

सांगली : अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही, तर सामान्य माणसाची अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे जलसंपदा तथा जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.

मौजे डिग्रज-कसबे डिग्रजमध्ये ११ कोटी रुपये खर्चून कृष्णा नदीवर बांधलेल्या पुलाचे ना.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भालचंद्र पाटील, जि.प.सदस्य विशाल चौगुले, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, पंचायत समिती सदस्य अजयसिंह चव्हाण,सरपंच गीतांजली इरकर,उपसरपंच प्रवीण कोळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पाटील म्हणाले,की आपण सर्वानी एकजुटीने महापुराच्या आपत्तीस तोंड दिले. महापुराने नदीकाठच्या गावांचे मोठे हाल झाले. भविष्यात महापरिासारख्या आपत्तीस तोंड देण्यासाठी नदीकाठच्या गावांना नाव देण्याची व्यवस्था शासन करेल. नदीकाठी क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. ही क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाच्या वतीने योजना हाती घेण्यात येईल. जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन जिल्ह्यातील पाणंद रस्ते केले जातील. शासन योजना सामान्य माणसापर्यंत पोहचल्या  पाहिजेत यासाठी अधिकाऱ्यानी दक्ष  राहिले पाहिजे. जर अडवणुकीचे धोरण स्वीकारले तर अशा अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

पी.आर.पाटील म्हणाले,की मंत्री पाटील यांनी ३५ वर्षांपूर्वी वाळवा तालुक्यात कार्यान्वित केलेल्या पाणी पुरवठा संस्था तालुक्याच्या वरदायिनी ठरल्या आहेत. स्व. राजारामबापू पाटील यांनी खुजगांव धरणाचा आग्रह धरला, मात्र त्यास राजकीय वळण लागले. सद्य:स्थिती अनुकूल असल्याने मंत्री पाटील निश्चितपणे वाकुर्डे  योजना पूर्ण करून जतपर्यंत पाणी नेण्यात यशस्वी ठरतील. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच गीतांजली इरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसरपंच प्रवीण कोळी यांनी आभार मानले.