“सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज लोणावळा येथील पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे. याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावार फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असतानाही एक साधा सुरक्षा रक्षक माझ्याजवळ नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंच्याला देखील जायचो, सगळीकडे जायचो. आज देखील मला एकही सुरक्षा रक्षक दिला नाही तरी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे आमची त्यावर कुठलीही तक्रार नाही, आक्षेप नाही.  काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, की जे काही आमचे सुरक्षा रक्षक काढले आहेत. त्यांचा वापर तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी करा. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायच्या ऐवजी जरा भंडारा सारख्या घटेनवर अधिक लक्ष सरकारने केंद्रीत केलं पाहिजे.”

नथुराम गोडेसेचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही –
मध्य प्रदेशमध्ये हिंदू महासभेकडून गोडसे ज्ञानाशाळा सुरू करण्यात आली. यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “नथुराम गोडेसेचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही. अशाप्रकारे जर कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चूक आहे. त्याचं समर्थन होणार नाही.”

हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये सुरू केली गोडसे ज्ञानशाळा

निवडणुकीसाठी शिवेसनेची नाटक – नौटंकी सुरू –
मला याचा आनंद आहे की, “गुजराती समाजाला निवडणुकीकरिता का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्त गुजराती समाजाशी संवाद ठेवला तर, शेवटी तेही आपले नागरिक आहेत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन आहे त्याला शिवसेना विरोध करत आहे. दुरीकडे गुजराती समाजाला जवळ करू असे म्हणत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे कोणीजवळ येत नाही. तुमच्या कृतींमुळे लोक जवळ येतात. निवडणुकाआल्यानंतर आता हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील जनाब बाळासाहेब ठाकरे झाले आहेत. उर्दुमध्ये शिवसेनेचे कॅलॅण्डर निघत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने नाटक नौटंकी चालली आहे. पण लोकांना समजतं ही नौटंकी कशासाठी आहे.” असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

बर्ड फ्ल्यू एक मोठं संकट –
“पाच राज्यामध्ये बर्ड फ्ल्यू आढळला आहे. महाराष्ट्रातील ज्या काही घटना आहेत. त्याही बाहेर येत आहेत. हे एक मोठं संकट आहे. लॉकडाउनमुळे कुकुट पालन करणाऱ्यांवर फार विपरीत परीणाम झाला होता. बर्ड फ्ल्यूमुळे खूप मोठ्या प्रमाणात कार्यवाही देखील करावी लागेल. तशा प्रकारचे संकेत मंत्री मोहदयांनी दिले आहेत. एकीकडे वेगाने कार्यवाही करावी लागेल आणि दुसरीकडे हे जे काही उद्योजक आहेत त्यांना मदत करावी लागेल.” असं यावेळी फडणीस म्हणाले.