राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसह मार्च किंवा एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता असलेल्या पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. शिवाय, आगामी निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

या बैठकांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”करोना काळात थोडी अनियमितता आली असली तरी देखील भाजपाची ही परंपरा आहे. प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची, कोअर कमिटीची, कार्यकारिणीची, विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नियमीत बैठक होत असते. त्यामुळे दोन दिवस त्याच नियमीतपणे होणाऱ्या बैठकींचा भाग म्हणून सर्व बैठका झाल्या. करोनाकाळात व्हर्चुअल बैठका झाल्या, सेवा झाली परंतु संघटन या विषयात आता थोडा वेळ द्यावा लागेल. त्यामुळे सर्व बैठका या लाईनवर झाल्या.”

आणखी वाचा- “सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”

“ज्या सहा विधानपरिषद निवडणुका झाल्या त्याची या बैठकांमध्ये समीक्षा झाली. आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना झाली. २८ कार्यकर्ते आगामी तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहेत. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे. किती ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यातील किती गावं ही भाजपाच्या सरपंच करण्याच्या दिशेने जातील, अशी सर्व योजना आखतील. १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बुथ स्तरापर्यंत काम कसं वाढेल, पाच महानगर पालिका व ९२ नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण मार्च अखेर किंवा एप्रिल मध्यात होणार आहेत, यासंदर्भात देखील योजना या बैठकीत आखण्यात आली आहे.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- तुमच्या बुडाला कोणाचा खळ? गुजरातीचा की मराठीचा?; शिवसेनेच्या हेमराज शाह यांचा भातखळकरांना सवाल

तसेच, राम मंदिर उभारणीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनात भाजपाचा मोठा सहभाग असणार आहे. त्या दृष्टीने देखील योजना या बैठकीत झाली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी वाचा- “मोदींच्या “आत्मनिर्भर पकौडा” योजनेच्या अभूतपूर्व अपयशानंतर, मुंबई भाजपा प्रस्तुत करत आहे ढॅण्टॅढॅण…”

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर कोअर कमिटी सदस्य, भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सर्व मोर्चा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.