प्रशांत देशमुख

वर्धेत शिकणाऱ्या मुलांबाबत जम्मू-काश्मीर सरकारने काळजी व्यक्त करीत थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याची घडामोड आश्चार्याची ठरली आहे.

येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या राणीबाई अग्निहोत्री शारिरिक शिक्षण महाविद्यालयात काश्मिरची १५ मुलं शिकत आहे. या मुलांची जेवणाची व अन्य सोय नसल्याची माहिती जम्मू-काश्मीर सरकारला विद्यार्थ्यांमार्फत कळाली. त्या अनुषंगाने सरकारच्या मुंबईस्थित सहनिवासी आयुक्त कार्यालयाने वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यात हस्तक्षेप करण्याचे सुचित केले. थेट अन्य राज्य सरकारच्यावतीने अशी विचारणा होण्याची ही वेगळीच बाब ठरली.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी संस्था सचिव सचिन अग्निहोत्री यांना या पत्राचा दाखला देत विचारणा केल्यावर त्यांना सुखद दिलासा मिळाला. या विद्यार्थ्यांच्यावतीने विशाल भारद्वाज याने आमची संपूर्ण व्यवस्था असून बाहेर राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे घरभाडेदेखील संस्थेने भरल्याचे उत्तर दिले. गॅस सिलेंडरदेखील मिळाले असून केवळ आम्हाला परतण्याची घाई झाली असल्याचा खुलासा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर संस्थेने मुलांची चर्चा करणारा व्हिडीओही देखील पाठविला. त्याच आधारे जिल्हा प्रशासनाने जम्मू-काश्मीर प्रशासनाला सर्व सुखरूप असल्याचे कळविले.

संचारबंदी उठल्यानंतर आणि वाहतूक सुरळीत झाल्यावर मुलांच्या प्रवासाची काळजी प्रशासन घेईल, अशीही हमी देण्यात आली. या उत्तरानंतरच सचिव अग्निहोत्रीसोबतच विद्यार्थीही निश्चिंत झाले. वर्धेत वैद्यकीय व अन्य शिक्षण संस्था अनेक राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.