टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी शुक्रवारी आपला ७५ वा वाढदिवस िपपरी-चिंचवड शहरात कंपनीच्या २० हजार कामगारांची भेट घेऊन साजरा केला. दिवसभर कामगारांमध्ये रमलेल्या टाटा यांनी त्यांच्यासमवेत कॅन्टीनमध्ये जेवण घेतले. कामगारांचे आपल्याप्रती असलेले प्रेम व आदर पाहून काही काळ ते भावुकही झाले. तर, आजचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.
तब्बल २१ वर्षे उद्योगसमूहाची धुरा समर्थपणे सांभाळलेल्या टाटा यांनी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ते वाढदिवशी अध्यक्षपदावरून पायउतार झाले. जवळपास तीन महिन्यांपूर्वी, आम्हा कामगारांसमवेत वाढदिवस साजरा करावा, अशी विनंती टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे यांनी कामगारांच्या वतीने टाटा यांच्याकडे केली होती. त्या विनंतीचा मान राखून टाटा शुक्रवारी कंपनीत आले. िपपरी व चिंचवड-भोसरी रस्त्यावरील प्लांटमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चापर्यंत त्यांनी कामगारांसमवेत वेळ व्यतित केला. दुपारी कामगारांसाठी असलेल्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. टाटा यांचे आगमन झाल्यानंतर कामगारांनी दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले, मानवंदना दिली व वाढदिवसाची शुभेच्छा देणारे गीतही गायले. त्यानंतर खुल्या जीपमध्ये उभे राहून टाटा यांनी कामगारांची विभागनिहाय भेट घेतली. अनेक कामगारांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांनी आस्थेने विचारपूसही केली. कंपनीच्या आवारात लेक हाऊसमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कौटुंबिक वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. काही मोजक्या मंडळींनी प्रातिनिधीक भावना व्यक्त केल्या. कामगारांच्या वतीने नेवाळे म्हणाले, टाटा यांनी भारताचे नाव जगात मोठे केले. आम्हा कामगारांना कायम आधार दिला. आम्ही देव पाहिला नाही. जे गुण देवात असतात, ते आम्ही टाटा यांच्यात पाहिले, असे ते म्हणाले.टाटा यांच्या भेटीने कामगार भारावून गेले. कंपनीत एखादा उत्सव साजरा झाला, असेच वातावरण होते.    
‘नॅनो प्रकल्प
म्हणजे वचनपूर्ती’
पुणे व िपपरी-चिंचवडचे नागरिक व कामगारांनी आपल्याला नेहमीच मोलाची साथ दिली, अशी भावना रतन टाटा यांनी व्यक्त केली. पुण्याबद्दल आपल्याला कायम आदर व प्रेम राहिले आहे. कामगार युनियनचे नेहमीच सहकार्य राहिले. जेव्हा कधी अडचण आली, तेव्हा ‘टीमवर्क’ मुळे त्यातून बाहेर पडू शकलो. नॅनो प्रकल्प म्हणजे वचनपूर्ती होती. वचन दिले की पाळण्याचे तत्त्व ठेवले म्हणूनच येथे येण्याचे वचन दिले होते व त्यानुसार आपण आलो. भविष्यातही बोलवले तरी येऊ व कामगारांच्या कोणत्याही अडचणीसाठी मदत करू, अशी ग्वाही टाटा यांनी दिली.