नक्षलवादामुळे शिक्षणाच्या सोयी नाहीत, रेल्वे, रस्ते व बस सुविधा नाही. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. एक वेळच्या जेवणासाठी आदिवासींना जंगलात भटकंती करावी लागते. आंबिल किंवा मुंग्यांची चटणी खावून दिवस काढावे लागत आहे. अठराविश्वे दारिद्रय़ घेऊन आम्ही जन्माला आलेलो आहोत, परंतु आम्हालाही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे तेव्हा किमान सिरोंचा तालुका दत्तक घेऊन विकासाचा मार्ग दाखवा, अशी मागणी कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे गुरुवारी केली. दरम्यान, विद्यार्थिनींच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे जन्मगाव करीमनगर हे सिरोंचापासून अवघ्या १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळेच राव यांची सिरोंचाशी भावनिक नाळ जुळलेली आहे. राज्यपालांचे हेलिकॅप्टर गुरुवारी दुपारी सिरोंचा येथे दाखल होताच गोदावरी नदीच्या तीरावर उभे राहून त्यांनी बराच वेळ करीमनगरची पाहणी केली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. सिरोंचा व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी करतांनाच विलंब होणाऱ्या अन्य दोन पुलांच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. सिरोंचा व करीमनगरचे अनोखे नाते असून पुलाचे काम पूर्ण होताच भविष्यात हे नाते आणखी वृध्दिंगत होईल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
राव यांनी कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट दिली असता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींशी तेलगू भाषेतून मनमोकळा संवाद साधला. मनावर कुठलेही दडपण न ठेवता जिल्ह्य़ातील समस्यांचा पाढा वाचला. नक्षलवाद्यामुळे या जिल्ह्य़ाचा विकास खऱ्या अर्थाने खुंटला असून प्राथमिक शिक्षाणाच्या सोयी येथे उपलब्ध नाहीत. रेल्वे तर सोडाच बहुतांश गावे रस्त्यानेही जोडली गेलेली नाहीत. वीज पुरवठा खंडित होणे, पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणे, टेलिफोन, भ्रमणध्वनी या सुविधा कोसो दूर आहेत. आरोग्यसेवा कोलमडली आहे. राज्यपालांनी शाळेची पाहणी केली, तसेच शिक्षणाच्या दर्जासोबतच जेवणाची व्यवस्था, सोयी सुविधा, विद्यार्थिनींच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
राज्यपालांना भेटण्यासाठी करीमनगर येथून शेकडो लोक व मित्रपरिवार आलेला होता. या वेळी राज्यपालांनी पोलिस ठाण्यात सर्वाची गळाभेट घेऊन सिरोंचा व करीमनगरचे श्रृणानुबंध आणखी वृध्दिंगत करण्याचे अभिवचन दिले. तत्पूर्वी, राव यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वनखात्याच्या
अगरबत्ती व वनौषध प्रकल्पाला भेट दिली. ७० टक्के जंगल राज्यात एकटय़ा गडचिरोली जिल्ह्य़ात शिल्लक असून तेथील वनौषधी प्रकल्प बघून राज्यपाल भारावले.
राज्यपालांची गाडी रोखली
पेसा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आलापल्ली येथे राज्यपालांची गाडी रोखून धरण्यात आली. या वेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत वर्ग ३ व ४ ची नोकर भरती करण्याची अधिसूचना काढली आहे. यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. गैरआदिवासी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी, जिल्ह्य़ात नकारात्मक मतदानाचे प्रमाण विक्रमी राहिले आहे.