पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ३९ जण शहीद झाले. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीनेही दोन वीर गमावले. या सगळ्यांना निरोप देताना आज देश हळहळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.

पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध केला जावा तेवढा थोडा आहे. संपूर्ण भारत देश आज या हल्ल्यामुळे उद्विग्न आहे, सगळ्या जनतेच्या मनात या हल्ल्याचा राग आहे. जे जवान या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला एकटं समजू नये. सव्वाशे कोटी जनता तुमचं कुटुंब आहे हे लक्षात असूद्या, कोणतीही काळजी करू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. शहीद जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, या हल्ल्याला आम्ही जशास तसे उत्तर देणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान हा भिकारी देश आहे, पाकिस्तानचा पंतप्रधान जगभरात भीक मागत फिरतो आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारच्या कुरापती काढतो आहे. त्यामुळे या हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिलं जाणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जशास तसे उत्तर देऊ हे उत्तर दिलेलेच आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातले जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली.