शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार टीका करणं सुरू केलं आहे. भाजपा नेत्यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“लतादीदी आणि सचिन तेंडुलकर हे भारतरत्न समाजातील आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मत हे महत्त्वाचे व त्यांचे असेल. पण इतरांचे काय? भाजपा हुकुमशाही मानणारा पक्ष आहे हे विसरता कामा नये. राष्ट्रीय हिरोंना निर्धास्तपणे आपले मत मांडता यावेत म्हणून भाजपा ची चौकशी झाली पाहिजे.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

तसेच, “यातून भाजपा कनेक्शन दिसते. अनेक जणांनी या अगोदर राजकीय ट्विट कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना दबाव आणून भाग पाडले जात आहे का? याची चौकशी आम्ही मागितली आहे. आमच्या विरोधात ही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आले पाहिजे. पण जर भाजपाची भीती असेल तर ती दूर झाली पाहिजे. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपा पासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत.” असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

“भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.” असं सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; ठाकरे सरकार करणार चौकशी

दरम्यान, झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.