राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपाने मुंबईतून ५०० कोटी रुपये पाठवण्यात आले असा गंभीर आणि घणाघाती आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही ती राज्यं अस्थिर करण्याचा पद्धतशीर अजेंडा राबवत आहे अशीही टीका सचिन सावंत यांनी केली आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले असाही आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

या प्रकरणात आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. कथित ऑडिओ टेप समोर आल्याच आहेत. आता सचिन सावंत यांनी हा नवा आरोप करुन खळबळ माजवून दिली आहे.

फक्त राजस्थानच नाही तर कर्नाटकच्या आमदारांना भाजपा सरकारच्या काळात मुंबईमधल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भात बैठका होत हत्या. राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी मुंबईतल्या बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी जमा केले आणि ते राजस्थानला पाठवले असंही सावंत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची कल्पना मी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिली आहे. असंही सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं.

राजस्थानात काय घडलं?

राजस्थानात अशोक गेहलोत सरकारमधून २५ आमदारांना घेऊन सचिन पायलट बाहेर पडले. त्यामुळे राजस्थानात राजकीय भूकंप झाला आहे. यामागे भाजपा आहे असा आरोप काँग्रेसने याआधीच केला आहे. सचिन पायलट काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपल्यासोबत २५ आमदार आहेत आणि गेहलोत सरकारकडे बहुमत नाही असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे.

या सगळ्या राजकीय तीन दिवस उलटत नाहीत तोच राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले असा आरोप काँग्रेसने केला आहे. आता या सगळ्याला भाजपाकडून काय उत्तर दिलं जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.