गुजराती व्यापाऱ्यांना मनसेने लक्ष्य केले असतानाच या घटनांचा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. गुजराती व्यापाऱ्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांचा आम्ही विरोध करतो. आपला लढा मोदी आणि त्यांच्या धोरणांविरोधात असून गुजराती समाजाविरोधात हा लढा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुकानांवरील गुजराती पाट्यांचा मुद्दा रविवारच्या जाहीर सभेत मांडला होता. यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी मुंबई आणि उपनगरातील गुजराती नामफलकांची तोडफोड केली होती. तर कांदिवलीतही राजूभाई ढोकलावाला या दुकानावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटकही केली.

मनसैनिक आक्रमक झाले असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. मनसेच्या गुंडांनी गुजराती व्यापाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा आम्ही विरोध करतो. आपण सर्वांनी मोदी आणि त्यांच्या धोरणाविरोधात लढा दिला पाहिजे. गुजराती समाजाविरोधात हा लढा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजराती व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या तोडफोडीच्या घटनांचा विरोध दर्शवला. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. पाट्यांवर फक्त गुजराती भाषेमध्ये नाव असणे हा मराठी भाषेचा अपमान आहे. पण त्यासाठी तोडफोड करणे ही पद्धत नव्हे. त्याचाही निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेले अनेक वर्षे आम्ही सांगतो आहोत की भाजपा सरकारला जिंकायचे असेल तर ते भारतामध्ये धार्मिक विद्वेष वाढवून दंगली घडवणे या अस्त्राचा ते वापर करतील. हे आता राज ठाकरे सुद्धा बोलू लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.