पक्षी नसेल तर उद्याचे जीवन जगता येणार नाही. पक्ष्यांचे रक्षण करून निसर्ग व शेतीला फायदा करून देतानाच पर्यटनालाही फायदा होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. नेरुरपार येथील वसुंधरा येथील सेव नेचर, सेव बर्ड या उपक्रमाप्रसंगी रेल्वेमंत्री प्रभू बोलत होते. या वेळी माजी आमदार राजन तेली, वाइल्ड कोकण अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपवनसंरक्षक रमेशकुमार, लुपीनचे योगेश प्रभू, सी. बी. नाईक, अमेय सुरेश प्रभू, उमा सुरेश प्रभू आदी उपस्थित होते. लुपीन फाऊंडेशन व वाइल्ड कोकणच्या विद्यमाने जिल्ह्य़ातील पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पक्ष्यांसाठी पाणी व दाणे योजनेचा शुभारंभ करण्यात आल्यावर रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. निसर्गाची विविधता पाहतानाच पक्षी, वनौषधीचे संरक्षण व संवर्धन व्हायला हवे. निसर्गाचा कोप किती भयंकर असतो हे जगात घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच निसर्गाचे रक्षण महत्त्वाचे आहे, असे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले.

निसर्गावर प्रेम करत निसर्गाच्या कलाने चालले पाहिजे. निसर्गाचा पक्षी हा एक भाग आहे. शेतीलाही पक्षीच उपयोगी ठरतो. पक्षी परागीकरणासाठीही उपयोगी आहे. त्यामुळे पक्षी नसेल तर उद्याचे जीवन जगता येणार नाही. पक्ष्यांचे रक्षण करून कोकणात पक्ष्यांची संख्या वाढवा, असे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
आज कीटकनाशके, खतामुळे पक्ष्यावर परिणाम होत आहे. पक्ष्यांना बोलवा, पक्षी घेऊन येईल व जाताना देऊन जाईल, असे पक्ष्यांचे उपयोग आहे. राजकीय पक्षांपेक्षा पक्ष्याच्या पक्षात आहोत असे मानून प्रत्येकाने पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन केले जाईल, असे प्रभू म्हणाले. पक्ष्यांचे संरक्षण करून मानवी जीवन समृद्ध करा, असे सांगत निसर्ग व मानवाचे नाते असून मानवाला निसर्गानेच जन्म दिला आहे हे विसरू नका, असे आवाहनही रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले. या वेळी वाइल्ड कोकणचे डॉ. गणेश मर्गज, प्रा. सुभाष गोवकर, महेंद्र पटेकर, शिवप्रसाद देसाई, अभिमन्यू लोंढे तसेच लुपीन, वसुंधरा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.