बिहारमध्ये आम्ही जदयूला आम्ही शब्द दिला होता तो आम्ही पाळला. महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द आम्ही दिलाच नव्हता असं भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.”बिहारमध्ये भाजपाने आधीच जाहीर केलं होतं त्यानुसार जदयूचे नेते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. भाजपाने दिलेला शब्द पाळला. मात्र महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये आज नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडतो आहे. सलग चौथ्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर बोलत होते. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपा आणि जदयूने आज मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या शपथविधीचं आयोजन केलं आहे. नितीश कुमार आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बिहारमध्ये कमी जागा येऊनही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद दिलं आहे. मात्र इथे भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदं स्वत:कडे घेतली आहेत. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, “भाजपने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत”
महाराष्ट्रात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटण्याच्या वादावरुन भाजपा आणि शिवसेना यांची युती संपली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मला भाजपाने खोटं पाडलं असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज बिहार निवडणूक निकालानंतर नितीश कुमार हे जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तेव्हा प्रवीण दरेकर यांनी आम्ही शिवसेनेला कुठलंही वचन दिलं नव्हतं असं म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 2:17 pm