आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या असतील तर १४४ जागा आम्हाला मिळायला पाहिजेत या मागणीवर आम्ही ठाम आहोत. या दुप्पटही जागा आम्ही मागू शकतो कारण आमचे खासदार तुमच्या दुप्पट आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी सातारा येथील निर्धार मेळाव्यात जागा वाटपाबद्दल ठाम भूमिका मांडली.
मेळाव्यात रामराजे नाईक िनबाळकर, सुनील तटकरे, शशिकांत िशदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आ. दीपक चव्हाण. आ. विद्याताई चव्हाण, आ. प्रभाकर घाग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, आयात केलेले उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरवू शकत नाही. मात्र भाजपने ज्या प्रमाणे सोशल मिडियाचा वापर केला तसा आपल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. केंद्रातील सध्याचे सरकार हे अनुभवाने कमी आहे. त्यांना दुष्काळा बाबत फारशी माहिती नाही. या पूर्वी आपले सरकार आणि परिस्थितीची जाणीव असणारे कृषिमंत्री असल्याने अवर्षणग्रस्त भागाला निधी आणत होतो. आमच्या सरकारने विविध योजना राबवल्या. शेतीसाठी टोल बंद करणे , बससाठी टोल माफ करणे या बाबी आम्ही केल्या असे सांगून कार्यकर्त्यांना कानपिचक्या देताना, बेरजेचे राजकारण करता आले नाही तरी वजाबाकीचे करू नका असा सल्ला दिला. मानपानाच्या खोटय़ा भ्रमात अडकू नका, सगळ्या घटकांना आपल्या पक्षाच्या माध्यमातून सकारात्मक मदत मिळते आहे असे काम करा असेही ते म्हणाले.
रामराजे नाईक िनबाळकर यांनी आघाडी करायची असेल तर आघाडीचा धर्म पाळावा लागेल. आमच्या बरोबर नांदायचे असेल तर व्यवस्थित नांदा नाहीतर घटस्फोट घ्या. पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद मजबूत आहे आणि विकास कामे आम्हीच केली आहेत तेव्हा आघाडी धर्म पाळण्याचा विचार काँगेसने करावा असे रामराजे नाईक िनबाळकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, शेतकरी संघटना आपले अस्तित्व माण,खटाव आणि फलटण या भागात दाखवत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना धनगर समाजाचे प्रश्नही तातडीने सोडवले पाहिजेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप त्याचे पालन झाले नाही.
 सुनील तटकरे म्हणाले, जनतेचा काँगेस विरोधात उद्रेक होता. लोकसभेत ती भावना संपली आहे. आता राष्ट्रवादीच्या विरोधात अशी भावना नाही. पण भाजप आणि मोदींच्या प्रचार यंत्रणेने ज्या प्रमाणे सोशल मीडियाचा वापर केला तसा वापर आपल्याला करता आला पाहिजे. मित्रपक्ष संभ्रम करत असेल तर तसा करू नका असे आमचे सांगणे आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही करू नयेत असे तटकरे म्हणाले.