भीमा कोरेगाव या ठिकाणी उसळेला हिंसाचार आपण सगळ्यांनीच पाहिला. मात्र या गावात राहणाऱ्यांनी जे भोगले ते अनुभव विषण्ण करणारे आणि अंगावर काटा आणणारे आहेत. भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैजयंता मुथा या महिलेने सांगितलेला अनुभव असाच आहे.

वैजयंता यांनी सांगितले, ‘आम्ही घरात बसलो होतो बाहेर काय सुरु आहे हे आम्हाला समजत नव्हते. तेवढ्यात आमच्या घराच्या वरून एक आवाज आला की बाहेर सगळे पेटले आहे तुम्ही वर या. एक मुलगा आला त्याने आम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मग मी आणि माझी कसेबसे वरती जाऊ लागलो. माझ्या मुलीचे वजन खूप जास्त आहे त्यामुळे तिला बाहेर पडताना अडचण आली. तिच्यापाठोपाठ मी बाहेर पडले. शिडी लावून आम्हाला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत घरात धूर झाला होता. आणखी थोडावेळ या धुरात अडकलो असतो तर काय घडले असते हे सांगताच येत नाही.’ हे सांगतानाच त्यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले.

‘पायातले त्राण निघून गेले होते. दोन-चार मुले आली आम्हाला पेटवलेल्या घरातून बाहेर पडलो. घराच्या मागे  असलेल्या दुसऱ्या घरात आसरा घेतला. त्या घरातून आम्ही आमच्या डोळ्याने आमचे घर जळताना पाहिले. तीन ते चार दिवस आम्ही लोकांच्या घरी राहिलो आमचे घर जळून खाक झाले आता आम्हाला सरकारने मदत करावी.’ अशी मागणी वैजयंता संजय मुथा यांनी केली.

आज सकाळी ११ च्या सुमारास भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. भीमा कोरेगावमध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. त्यांच्यात कोणताही वाद नाही. या गावात घडलेला हिंसाचार हा बाहेरून आलेल्या चिथावणीखोर समाजकंटकांनी घडवला. या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच आमच्या गावाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांनी थांबवाव्यात असेही आवाहन करण्यात आले.