गावे वगळण्यासंदर्भात बहुतांश हरकती महापालिकेच्या बाजूने

वसई : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यासाठी शासनाने हरकती मागविल्यानंतर पालिका आणि वसई प्रांताधिकाऱ्यांकडे हजारो हरकतींचा पाऊस पडला. वसई-विरार महापालिकेकडे ९ हजार, तर वसई प्रांताधिकाऱ्यांकडे तब्बल २५ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. बहुतांश हरकती या महापालिकेच्या बाजूने आल्या आहेत.

वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यासंदर्भात राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार विभागीय कोकण आयुक्तांनी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हजारो हरकती वसई-विरार महापालिका, वसई प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आल्या. वसई-विरार महापालिकेत ९ हजार ४३६, तर वसईच्या प्रांताधिकाऱ्यांतडे २५ हजारांहून अधिक हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या वगळलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायत राहावी की त्यांची नगर परिषद स्थापन करावी याबाबत नागरिकांची मते मागविण्यात आली आहेत. २५ नोव्हेंबरपासून ही मते मागविण्यात आली असून नागरिकांना १ डिसेंबरपर्यंत आपली मते नोंदविता येणार आहेत.  महापालिकेच्या एकूण ६ प्रभागांत मिळून ९ हजार ४३६ हरकती  दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश हरकती या महापालिकेच्या बाजूने आहेत. वालीव येथील प्रभाग समिती ‘एच’ कार्यालयात २ हजार ५२७ हरकती आल्या. त्यातील सर्वच्या सर्व हरकती या महापालिकेच्या बाजूने आहेत. आम्हाला महापालिका हवी आहे, महापालिकेतून वगळू नका, असे या हरकतींमध्ये म्हटले आहे. आम्ही या सर्व हरकतींची छाननी केली, परंतु एकही अर्ज महापालिकेच्या विरोधात नव्हता. सर्वांना महापालिका हवी आहे अशा आशयाचे सर्व अर्ज होते, अशी माहिती वालीव येथील ‘एच’ प्रभाग समितीचे प्रभारी साहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम यांनी सांगितले. वालीवच्या ‘एच’ प्रभाग समितीच्या अखत्यारीत चिंचोटी, कोल्ही, कामण, देवदळ, ससूननवघर आणि बापाणे अशी ६ गावे आहेत.

विरार पूर्वेच्या प्रभाग समिती ‘सी’ (चंदनसार) अखत्यारीत कसराळी, दहिसर, कोशिंब आणि कणेर अशी ४ गावे येतात. या गावांतून ३६८ हरकती नोंदविण्यात आल्या. त्यादेखील बहुतांश महापालिकांच्या बाजूने असल्याची माहिती प्रभारी साहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्विस यांनी दिली. विभागीय कोकण आयुक्त तसेच प्रांताधिकाऱ्यांकडे आलेल्या हरकतींची छाननी होणे बाकी आहे. मात्र पालिकेकडे आलेल्या सर्व हरकती गावांच्या विरोधातच कशा याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे. आमच्या ससूननवघर गावातून आम्ही शेकडो हरकती वसई प्रांताधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. आम्हाला ग्रामपंचायत हवी आहे, असे ससूननवघर गावातील रहिवासी सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.

आमच्याकडे एकूण २५ हजार हरकती आलेल्या आहेत. त्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्यांचा अहवाल नंतर शासनाला सादर केला जाईल. – स्वप्निल तांगडे, प्रांताधिकारी, वसई विभाग

 

आमच्याकडे आलेल्या २ हजार ५२७ हरकती आल्या आहेत. त्यातील सर्व हरकती महापालिकेच्या बाजूने आहेत. आम्हाला महापालिकेतून वगळू नये अशी विनंती या अर्जांतून करण्यात आली आहे. – राजेंद्र कदम, प्रभारी साहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ‘एच’ (वालीव)