08 March 2021

News Flash

करोना संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते

करोना संकटातून सगळ्यांनी मिळून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. लॉकडाउनची चांगली अमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण करोनाचा प्रसार रोखला. आता मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला ही साथ वाढू द्यायची नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.

यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी करोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते

मुख्यमंत्री म्हणाले की, “आज करोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो. ”

“आपण केलेल्या कडक लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही” असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 8:08 pm

Web Title: we will fight together against corona virus says cm uddhav thackeray in all party meeting via video conference scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा विचार – राजेश टोपे
2 Coronavirus: नांदेडच्या ‘त्या’ तीन संशयीत रूग्णांमुळे चंद्रपूरात खळबळ
3 सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम – छगन भुजबळ
Just Now!
X