पुलवामा मध्ये जवानांवर झालेल्या हल्लामुळे देश संतापला आहे. ही परिस्थिती एकीकडे तर दुसरीकडे आक्रोश आहे, महाराष्ट्राच्या मातीनेही सुपुत्र गमावले. या जवानांच्या कुटुंबीयांना मी नमन करतो आणि त्यांना ज्या आईने जन्म दिल्या त्या सगळ्यांनाच मी प्रणाम करतो. आपले जवान आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत सगळा देश उभा आहे, त्यांनी स्वतःला एकटं समजू नये. त्यांचं दुःख मोठं आहे, मात्र सव्वाशे कोटी जनता त्यांच्यासोबत आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. धुळ्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत त्या अश्रूंचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भारत नव्या रितींचा आणि नव्या नीतींचा देश आहे याचा अनुभव आता जगालाही येईल असाही इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बंदुक चालवणारे, हल्ला घडवणारे सगळ्यांची झोप उडवू यात मला काही शंका नाही. भारतीय नीती आहे आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, कोणी वाटेला गेला तर मात्र शांत बसत नाही हे लक्षात असूद्या असेही मोदींनी म्हटले आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात CRPF चे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेने सगळा देश हादरला. या घटनेचा निषेध देशभरातून होतो आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या अशी मागणी होते आहे. अशात आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत त्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.