परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा कंबरडं मोडलं. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पिक पावसामुळे वाया गेलं. शेतकरी संकटात सापडलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत यावरुन विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना राज्य सरकार कमी मदत करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार होतो आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
आणखी वाचा- मी तुम्हाला पुन्हा उभं करेन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं बळ
सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं आणता येत नाही. राज्याच्या हक्काचे GST चे पैसे अद्याप केंद्राकडून आलेले नाहीत. ते आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिक मदत होईल. पण तोपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते केलं जाईल. काही दिवसांमध्ये दसरा येतोय, त्यानंतर दिवाळी येतेय. सणासुदीला राज्यातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही ही माझी जबाबदारी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा बिल्ला मी शोभेसाठी खिशावर लावलेला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा- चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला वेळच नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार यांनी सर्वात आधी राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली. यानंतर भाजपाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याची टीका केली. मध्यंतरीच्या काळात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये असं आवाहन केलं होतं. ज्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मला थिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचं सांगत फडणवीसांना टोला लगावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 3:45 pm