नवा महाराष्ट्र घडवायचा असल्यानेच जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा जनतेचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच सुरु केली आहे. जळगावातल्या पाचोरा या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली त्या ठिकाणी केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगितला. मला कोणतं तरी पद हवं आहे म्हणून मी ही यात्रा सुरु केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्या मतदारांनी मतं दिली त्या सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत. त्यांची मने जिंकायची आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आज माझे आजोबा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनी मला हेच सांगितले असते की ज्यांनी आपल्याला निवडणुकीत मतदान केले आहे त्यांचे आभार मानण्यासाठी जा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहू नकोस, त्यामुळेच तारीख, वार, मुहूर्त न पाहता मी ही यात्रा सुरु केली आहे.

मध्यंतरी मी मराठवाड्यात फिरलो. तिथल्या लोकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता जन आशीर्वाद यात्रेतूनही असाच प्रयत्न करायचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला मतदान केले त्या सगळ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी मी ही यात्रा काढली आहे. तसंच येत्या निवडणुकीत मतदारांकडून शिवसेनेलाच मतदान केले जावे यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.