परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबिर

परभणी : पीकविम्यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून, राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतीशी संबंध नसलेल्या विमा कंपन्यांनी यात मोठय़ा प्रमाणात आíथक घोटाळा केला असून, शेतकऱ्यांना मात्र पीकविम्याच्या भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. कर्जमाफीतही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. हे सरकार ज्या ठिकाणी चुकते त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवणारच, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप आणि जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन झाले. या वेळी आयोजित दुष्काळ निवारण संकल्प शिबिर उद्घाटनप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जयप्रकाश मुंदडा, युवासेना कोअर कमिटीचे वरुण सरदेसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

एरंडेश्वर शिवारात संपूर्णत: सौरऊर्जेवर चालणारी सूतगिरणी उभारण्यात येत असल्याने विकासाच्या दृष्टिकोनातून हे एक नवे पाऊल ठरणार आहे.  दुष्काळावर मात करण्यासाठी पशुखाद्य, पाण्याचे टँकर व रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात शेतमालाची निर्मिती केली जात आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, मुंबईत लवकरच सुरू होणाऱ्या आठवडे बाजारात हा सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काहीही समजत नाही, परंतु जमेल ती मदत करून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचेही ठाकरे म्हणाले.

या वेळी खासदार जाधव यांनी शिवसेनेने मतासाठी कधीही राजकारण केले नाही. संकटग्रस्तांच्या मदतीला शिवसेना नेहमीच धावून गेली आहे.  शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंब उघडय़ावर पडते. दुष्काळाला घाबरू नका, हिंमत हरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात आमदार डॉ. पाटील म्हणाले, जयभवानी महिला सूतगिरणी सौरऊर्जेवर चालणारी पहिली सूतगिरणी आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय महिला बचतगटांसाठी पतसंस्थेची निर्मिती केली असून, या माध्यमातून अल्पदराने बचतगटांना कर्जवाटप करण्यात येत आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगारासाठी युवासेनेच्या माध्यमातून कार्य करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

या वेळी आत्महत्याग्रत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिलाई मशिन वाटप, शेळय़ामेंढय़ा वाटप, पशुखाद्य वाटप, मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या युवकांना ट्रॅक सूट आदींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले.