उजनी धरण ते सोलापूर थेट पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्र पाडून जमिनीखालून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी पळून नेत शेती फुलविणाऱ्या १९ शेतक ऱ्यांविरुद्ध सोलापूर महापालिका प्रशासनाकडून पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. या पाणी चोरीत राजकीय वरदहस्त लाभलेल्या काही बडय़ा शेतक ऱ्यांसह पालिकेच्या यंत्रणेचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी पालिका पाणीपुरवठा विभागातील एका उपअभियंत्याची चौकशी सुरू केली आहे. ही पाणी चोरी सुमारे दोन कोटी रुपये किमतीची असून या कारवाईत संबंधित शेतक ऱ्यांच्या शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
उजनी धरण-सोलापूर थेट पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी माढा तालुक्यातील वरवडे, अरण, मोडनिंब, तर मोहोळ तालुक्यातील शेटफळ, तेलंगवाडी आदी ठिकाणी फोडण्यात आली असून जलवाहिनीला खालच्या बाजूने छिद्र पाडून त्याद्वारे शेतात पाइपलाइन टाकून पाणी चोरले जात होते. दररोज सुमारे १५ एमएलडीपेक्षा जास्त पाणी चोरी झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. दोन वर्षांपूर्वीही अशी पाणी चोरी उघडकीस आली होती. त्यानंतर आता पुन्हा पाणीचोरी उघड झाल्यामुळे पालिका प्रशासन हादरले आहे. पालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
सुमारे शंभर किलोमीटर लांबीच्या उजनी-सोलापूर थेट जलवाहिनी योजनेद्वारे दररोज ८० एमएलडी पाणी उचलले जाते खरे; परंतु प्रत्यक्षात ६० ते ६५ एमएलडी एवढेच पाणी शहरात येते. उर्वरित पाणी कोठे जाते, याचे उत्तर आतापर्यंत अनुत्तरीतच होते. या जलवाहिनीला अधुनमधून होणारी गळती रोखण्यासाठी पालिकेचे फिरते पथक कार्यरत आहे. या कामाचे मध्यंतरी खासगीकरणही करण्यात आले होते. परंतु त्याचा चांगला परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे पुन्हा हे काम पालिकेच्या यंत्रणेकडेच आले आहे. या पाश्र्वभूमीवर ही पाणीचोरी उघडकीस आली. या पाणीचोरीत राजकीय पाठबळ असलेल्या काही धनदांडग्या शेतक ऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिका पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजय राठोड यांच्यावरही संशय व्यक्त होत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.