वर्षां पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या आंबोली आता साहसी पर्यटनाबरोबर नाईट रायडींगसाठी विकसित केली जात आहे. वनौषधीसोबत विविध प्रजाती पाहण्याची संधी अनेक पर्यटकांना उपलब्ध होत आहे. यात भर म्हणून आंबोलीतील निर्णय राऊत या युवकाने आंबोली टुरीझम डॉट कॉम नावाची साईट तयार करुन देशासह विदेशातील पर्यटकांना पर्यटनांची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

इंटरनेटच्या एका क्लीकवर आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावातील पर्यटनस्थळे तसेच वैशिष्ट्यांची माहिती संबंधितांना मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराचे नवे दालन या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज या वेबसाईटचे उद्घाटन झाले. जैवविविधतेने परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे पर्यटनस्थळ डोळ्यासमोर येते. याठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. याठिकाणच्या पर्यटनातील पावसाळा हा मुख्य वर्षां पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. येथे या हंगामात लाखो पर्यटक फक्त आंबोलीतील नयनरम्य पर्यटनस्थळे पाहत पावसात तसेच धबधब्यांखाली भिजण्यासाठी येतात. काही येथील शुद्ध थंडगार हवेसाठी येतात.

आंबोली परिसर हा जैवविविधतेने परिपूर्ण असा भरलेला असल्याने निसर्गप्रेमी पर्यटक व अभ्यासक यांची हजारोंच्या संख्येने येथे ये-जा असते. असे असूनही आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील अनेक पर्यटनस्थळे, जैवविविधतेचे ठिकाणे, नयनरम्य देखावे व गावातील लोकांचे जीवन अनुभवणे, असे विविध पर्यटनास अनुकूल असलेल्या बाबी दुर्लक्षित आहेत. त्या पर्यटकांपर्यत पोहोचविण्याचे काम या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येथील बारमाही पर्यटनासाठी प्रयत्न आंबोली टुरिझमच्या माध्यमातून केले जाणार आहे.

निर्णय राऊत यांना निसर्गाची आवड आहे. स्वतचे शिक्षण चालू असताना आंबोली टुरिझम वेबसाईटद्वारे पर्यटनवाढीसाठी योगदान देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. आपल्या या खारीच्या प्रयत्नात पर्यटनाला चालना मिळण्याबरोबर स्थानिकांना रोजगारांच्या संधी मिळतील यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

हे संकेतस्थळ ऑनलाईन-ऑफलाईन उपलब्ध असून यावर तिन्ही गावांच्या माहितीबरोबरच हॉटेल बुकिंग, बेस्ट रेस्ट्रॉरन्ट, व्हिलेज टुरिझम, ट्रेकिंग, टेंट काँपिंग, सफारी, वाहतूक सेवा, नेचर कॅम्प, एडवेंचर स्पोर्ट, स्पेशल पॅकेज, इतर सहली आदीची माहिती आहे.

पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते या वेबसाईटचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबोली उपसरपंच विलास गावडे, चौकुळ माजी सरपंच विजय गावडे, गाववाले बहुउद्देशयिय पर्यटन संस्थेचे अध्यक्ष अरुण गावडे, सामाजिक कार्यकत्रे महेश पावसकर, नाना आवटे, रुपेश गावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

‘या बेवसाईटच्या माध्यमातून पर्यटकांना देण्यात येणार्या विविध सेवा सुविधा गाववाले बहुउद्देशयिय पर्यटन संस्था आंबोली, चौकुळ, गेळे आिदच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या संस्थेत असलेल्या स्थानिकांना याचा फायदा होणार आहे. यात महिलांची संख्या जास्त आहे.’ असे बहुउद्देशयिय पर्यटन संस्थेचे  अध्यक्ष अरुण गावडे यांनी सांगितले