News Flash

लग्नसराई, यात्राउत्सव निर्बंधांमुळे व्यावसायिक अडचणीत

मंडप डेकोरेटर, वाजंत्री, फूलविक्रेते, आचारी यांच्यासमोर आर्थिक पेच

(संग्रहित छायाचित्र)

कल्पेश भोईर

करोनाचा विषाणूचा संसर्ग सलग दुसऱ्या वर्षीही कायम राहिला आहे. यामुळे लग्नसराई, यात्राउत्सव व इतर समारंभ रद्द करण्यात आले आहे. याचा विपरीत परिणाम यावर अवलंबून व्यावसायिकांवर झाला आहे. मंडप डेकोरेटर, छायाचित्रकार, फूलव्यावसायिक, आचारी, वाजंत्री, वाढपी व इतर व्यावसायिक यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.

जानेवारी ते मे या कालावधीमध्ये लग्नसमारंभ, विविध कार्यक्रम, गावोगावच्या यात्रोत्सव होत असतात. परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध आले आहेत. यामुळे लग्नसमारंभात उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे सर्व साहित्य डेकोरेटर्सना गुंडाळून गोदामात ठेवावे लागले आहे. मागील वर्षीसुद्धा करोनामुळे मोठे नुकसान झाले होते. परंतु डिसेंबरनंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल या आशेवर व्यापाऱ्यांनी पुन्हा उभारी घेत तयारी केली होती. नवीन मंडपाचे कापड, विविध प्रकारचे आकर्षक सेट, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदी वस्तूंची खरेदी करून ठेवली होती. तर काही कार्यक्रमांच्या नोंदणीही केल्या होत्या. त्यासाठी काही साहित्य भाड्याने मागविण्यात आले होते ते परत पाठवावे लागले आहे. त्यातच आता मंडप बांधणीचे काम करणाऱ्या कामगारांना कसे सांभाळायचे, असाही पेचही मंडप व्यावसायिकांसमोर आहे.

लग्नसमारंभ व इतर समारंभा७साठी विविध प्रकारच्या शोभिवंत फुलांची सजावटीसाठी मोठी मागणी असते. तर लग्नघरी हार, फुले, गजरे, वेण्या, तोरणे अशा विविध प्रकारच्या ऑर्डर मिळतात, परंतु कार्यक्रमच रद्द झाल्याने पुन्हा हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. स्वादिष्ट भोजन तयार करण्यासाठी व जेवण वाढण्यासाठी आचारी व वाढपींना मागणी असते. यातून त्यांची चांगली कमाई होत असते. या चार महिन्यांतच जी कमाई होते त्यावर त्यांच्या कुंटुंबांचा पुढील वर्षभराचा उदरनिवाह चालतो. आता त्यावरही निर्बंध आल्याने घरीच बसून राहावे लागत असल्याचे आचारी व वाढपींनी सांगितले.

या कार्यक्रमांवर अवलंबून असणाऱ्या छायाचित्रकारांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल, मे हे महिने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असून त्यातच कमाई होत असते. परंतु आता ऑर्डर नाहीत तर करायचे काय, असा प्रश्न आहे. चांगल्या ऑर्डर मिळतील या आशेने अनेकांनी महागडे कॅमेरे खरेदी केले होते. परंतु आर्थिक परिस्थितीपुढे तेही कॅमेरे विकण्याची वेळ आली असल्याचे छायाचित्रकार महेंद्र भगत यांनी सांगितले. मंडपाचे साहित्य व इतर सर्व वस्तू या नवीन खरेदी केल्या होत्या, परंतु आता ऑर्डर रद्द झाल्याने त्या पडून राहणार आहेत. अशी माहिती साई गणेश डेकोरेटर्सचे धीरज म्हात्रे यांनी दिली.

एप्रिल-मे महिन्यातील लग्न मुहूर्त

एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१, अशा तारखा आहेत. परंतु काहींनी या तारखा पुढे ढकलल्या आहेत तर काही जण परिस्थितीनुसार लग्नसमारंभ करणार आहेत.

वाजंत्री कलावंतही अडचणीत

शुभमंगल कार्य व गावोगावचे पालखी सोहळे हे वाजंत्र्यांशिवाय पूर्ण होत नाही. परंतु त्याही कार्यक्रमांना बंदी असल्याने त्यांचा रोजगार गेला आहे. लग्नसराई म्हणजे आम्हा कलावंतांसाठी सुगीचे दिवस असतात. अशा वेळी आम्ही कलावंत एकमेकांना सहकार्य करून वाजविण्याच्या ऑर्डर घेतो. आता घेतलेल्या ऑर्डर रद्द झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे स्वर संगीत बँड पथकाचे गणेश भाईंदरकर यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:53 am

Web Title: wedding business difficulties due to travel restrictions abn 97
Next Stories
1 १०० खाटांचे काळजी केंद्र
2 खार्डी गावात शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व उदयास
3 वाढीव ‘पॅकेज’मुळे व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसनाला गती मिळणार?
Just Now!
X