वर्धा : लग्न सोहळ्यावरून परतलेली काकू करोना बाधित निघाल्याने पूतण्याचा सोमवारी होणारा विवाह रद्द करावा लागण्याची घटना आर्वीत घडली. स्थानिक भाजपा नेता असलेल्या एका नगरसेवकाची पत्नी अमरावतीचे एक लग्न आटोपून १७ जूनला आर्वीत परतली. बँक कर्मचारी असलेल्या या महिलेने १७ ते २५ जून दरम्यान बँकेत सेवाही दिली. मात्र तीन दिवसापूर्वी प्रकृती बिघडल्याने तपासणी करण्यात आली. तसेच करोनाची चाचणीही करण्यात आली.
अहवाल पॉझिटीव्ह आल्याने लगेच सेवाग्रामच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसर प्रतिबंधीत झाला. कुटूंबातील सर्व सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र यामूळे कुटूंबातील संभाव्य नवरदेवाची चांगलीच गोची झाली. सदर महिलेचा पूतण्याचा सोमवारी आर्वीत विवाह होता. वधू नागपूरातून येणार होती. नाममात्र विवाह सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाला परवानगी मागण्यात आली. परंतू काही सदस्य अती जोखमीचे व उर्वरित विलगीकरणात असल्याने विवाहास परवानगी देण्याचे प्रशासनाने स्पष्टपणे नाकारले.
रविवारी असलेला संगीत सोहळाही रद्द करण्यात आला. करोनाबाधित असल्याचे दिसून येण्यापूर्वी सदर महिला विवाहपूर्व काही कार्यक्रमात हजर होती. त्यामूळे त्या कार्यक्रमात सहभागी सगळ्यांना तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आता हा विवाह सोहळा अनिश्चिात काळासाठी पूढे ढकलल्या गेला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 30, 2020 1:21 pm