लाखो भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी लाडक्या गणरायाचे शुक्रवारी उत्साही वातावरणात आगमन झाले. सोलापुरात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये या लोकदैवताचे स्वागत करण्यात आले. शहरात सुमारे १,३७९ तर जिल्हा ग्रामीणमध्ये सुमारे तीन हजार सार्वजनिक मंडळांतर्फे गणरायाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून वरुणराजाची दमदार हजेरी लागत असल्यामुळे गणरायाचे स्वागत करताना उत्साह विशेषत्वाने दिसून आला.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी म्हणजे १८८५ साली स्थापन झालेल्या मानाच्या आजोबा गणपती मंडळाच्या (श्रद्धानंद तालीम) ‘श्री’ ची प्रतिष्ठापना मंडळाचे विश्वस्त-अध्यक्ष अॅड. गौरीशंकर फुलारी यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात करण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक मंडळ , लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ, पूर्वभाग, लष्कर विभाग, विजापूर रोड, विडी घरकूल आदी पाच प्रमुख मंडळांच्या अधिपत्याखाली १,३७९ सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यंदा जुळे सोलापूर व हद्दवाढ भागात मंडळांची संख्या वाढल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सवास प्रारंभ होताना श्री प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांसह पूजाविधीसाठी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना मंडळांनी आमंत्रित केले असून यात मोठय़ा प्रमाणात अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काल गुरुवारी सायंकाळपासून शहरातील पूर्व भागात कन्ना चौक, राजेंद्र चौक, साखर पेठ, रविवार पेठ आदी परिसरात विविध मूर्तीकारांच्या कारखान्यांमध्ये तयार झालेल्या लहान-मोठय़ा आकाराच्या गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांची रेलरेल होती. या भागात गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी सुमारे चारशे दालनांची उभारणी करण्यात आली होती. कन्ना चौक, कोंतम चौक, दत्त चौक, नवी पेठ, मधला मारुती, बाळीवेस आदी भागात गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका वाजत गाजत निघाल्याचे पाहावयास मिळाले. पत्रा तालीम येथे संयुक्त लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाच्या पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर थोरला मंगलवेढा तालीम मंडळाच्या देखण्या गणरायाची प्रतिष्ठापना चौपाडात करण्यात आली. सोन्या मारुती मंडळाने जीर्ण झालेली चांदीची ‘श्री’ची मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. नऊ फूट उंचीच्या या नव्या गणरायाच्या मूर्तीची काल गुरुवारी वाजत-गाजत प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढण्यात आली होती. कसबा गणपतीची मिरवणूकही तेवढीच भव्य प्रमाणात निघाली होती. अवंती नगरातील वीर गणपतीच्या मिरवणुकीत लेझीम पथकासह भजनी मंडळाचा सहभाग होता. जुनी मिल चाळ मंडळाच्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक महापालिका स्थायी समितीचे सभापती विनायक कोंडय़ाल यांच्या नेतृत्वाखाली निघाली होती. बुधवार पेठेतील वडार समाजाचा अय्या गणपती, बाळीवेस गणपती, नव्या पेठेतील जयहिंद चौक मंडळ, बाजीराव चौकातील शिव प्रतिष्ठान मंडळ, देगाव रस्त्यावरील नवस्फूर्ती मंडळ आदी मंडळांच्या मिरवणुकी लक्षवेधी होत्या. शिव प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत कोल्हापुरी फेटे परिधान केलेल्या महिलांचे पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. दुपारनंतर प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. यात लेझीम, झांज, टिपरी सारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन करताना तरुणाईला उधाण आले होते. मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अबीर-गुलाल, अरगजा, तसेच फुलांची मुक्तपणे उधळण केली जात होती. एकाच प्रकारच्या गणवेशात लेझीमचे विविध डाव सादर करताना तरुण मंडळांचे कसब वाखाणण्याजोगे होते. त्यात शिस्त व तरुणाईचा अनोखा संगम पाहावयास मिळाला. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाची पर्वा न करता तरुणाईचा उत्साह कायम होता. सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला तेव्हा मात्र सर्वाची त्रेधातिरपीट उडाली.
शहरात ५१ अतिसंवेदनशील व १८ संवेदनशील ठिकाणी तात्पुरत्या पोलीस छावण्या उभारण्यात आल्या आहेत. उंच इमारतींवर सुद्धा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सार्वजनिक धार्मिक स्थळे, पुतळे तसेच गणेशोत्सव मंडळांची ठिकाणे घातपात विरोधी पथकांद्वारे तपासली जात आहेत.