संवाद दहावी दिवाळी
दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अभ्यासाला आणि मार्गदर्शनाला मिळाल्या तर अनेकांना त्याचा उपयोग होतो हे जाणून २० वर्षांपूर्वी केलेला प्रयोग आता चांगलाच यशस्वी झाला आहे. दहावीची परीक्षा आता अवघ्या काही महिन्यांवर आली असताना पेपर कसे सोडवावेत, चुका कशा टाळाव्यात आणि योग्य पद्धतीने पेपर सोडविल्यानंतर गुणांची चढती भाजणी कशी कमावता येते हे दहावी दिवाळी अंकातून पाहण्यास मिळते. उत्तरपत्रिकेतील पहिल्या पानावरील बारकोड कसा भरायचा येथपासून सर्व प्रकारचे मार्गदर्शन या अंकातून मिळते. दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या अस्मिता मांढरे, श्रुती अगिवाल, देशना शाह, संजिवनी पवार, भूषण कांत, संगीता स्वामीनाथन, तृष्णा कटारे, शुभम खोसे, शर्व पाटील आणि आदिती भोसले या सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सूचना आणि त्यांची मेहनत यातूनही बरेच शिक्षण दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल.
संपादक : विजय कोतवाल
किंमत : ३२५

संवाद बारावी दिवाळी
दहावीची अवघड पायरी पार केल्यावर विज्ञान शाखेची आणखी एक अवघड पायरी पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा बारावी दिवाळी अंक मोलाचा आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कोणत्या चुका टाळायच्या आणि केवळ बारावीचीच नव्हे तर सीईटीचे पेपरही कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन या अंकातून करण्यात आले आहे. हर्षिता शेट्टी, भूमिका सदभावे, अपूर्वा पोठरकर, ढिन्निया सेनगुप्ता, सानिका दुसेजा, प्रसाद चन्न्ोवार, यशश्री कोल्हे, तुषार लाखे, मृण्मयी जोशी, हृषिकेश पतंगराव आणि अक्षय लबडे या विविध विषयांत सर्वोत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शन यातूनही विद्यार्थ्यांना बरेच काही शिकायला मिळेल.
वयम
किशोरवयीन मुलांचे जीवन, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्यातील अभ्यासूपणा, चौकस-अल्लड-खेळकर वृत्ती अशा विविध बाजूंनी या मुलांच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणारा हा दिवाळी अंक आहे. सुबोध जावडेकर यांचा ‘मानवा, सोड तुझा अभिमान’ हा पक्षी, प्राणी यांच्यातील प्रतिभा अधोरेखित करणारा लेख वाचकांना आकर्षित करणारा आहे. टीव्हीतील कार्टुनचा आवाज डबिंग करणाऱ्या मेघना एरंडे यांची मुलाखत मुलांना प्रेरणा देणारी आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील कलाकारांशी साधलेला संवाद बालगोपालांना खूप काही शिकवून जाणारा आहे. जीनिअस आइनस्टाइन यांच्यावरील ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचा लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. तसेच, काही मजेदार, निरागस कथांमुळे अंक वाचनीय ठरला आहे.
संपादक : शुभदा चौकर
किंमत : १०० रुपये.

युगांतर
‘युगांतर’चा यंदाचा दिवाळी अंक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून भारतात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या वातावरणावर भाष्य करणारा आहे.
अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या रिंगण नाटय़ाबाबतचा डॉ. हेमू अधिकारी यांचा लेख, कॉ. पानसरे यांच्या संदर्भातील ‘शिवरायांचा अन्वयार्थ’ हा इतिहासकार जयसिंगराव पवार यांचा लेख, प्रा. अविनाश डोळस
यांचा आंबडेकरी आणि कम्युनिस्ट चळवळींमधील नात्याचा वेध घेणारा लेख अतिशय वाचनीय व अंतर्मुख करणारे आहेत.
याशिवाय, रणधीर शिंदे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, अच्युत गोडबोले, जयदेव डोळे यांनीही आपल्या लेख-कथांमधून सध्याच्या सामाजिक वातावरणावर केलेले भाष्य वाचनीय आहे.
संपादक : डॉ. भालचंद्र कानगो
किंमत : १०० रुपये.
हेमांगी
सन १९७५ ते २०१५ या ४० वर्षांच्या कालखंडात देशासह महाराष्ट्राने अनेक बऱ्यावाईट घडामोडींचा अनुभव घेतला आहे. या काळातील स्थित्यंतराचे सिंहावलोकन करणारे दिनकर गांगल, दादूमिया, आल्हाद गोडबोले, संजीवनी खेर, डॉ. भारतकुमार राऊत आणि सुषमा शाळिग्राम यांचे लेख वाचकांना अंतर्मुख करणारे आहेत. आर्थिक परिवर्तनाबाबत वाय. एम. देवस्थळी, सुरेश वांदिले आणि योगेश बंबार्डीकर यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. ‘वेध कर्तृत्वाचा’ यामध्ये शरद पवार, नितीन गडकरी यांच्या मुलाखती वाचनीय आहेत. दुष्काळ टंचाईबाबत शेतकऱ्यांची परिस्थिती किशोर आपटे यांनी अचूकपणे मांडली आहे. संजीव साबडे यांचा ‘किती बदलून गेली खाद्यसंस्कृती’ या लेखही वाचनीय आहे. शुभदा साने, समीर वाकणकर, गुरुनाथ तेंडुलकर यांच्या कथा वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.
संपादक : प्रकाश कुलकर्णी
किंमत : १२० रुपये.

पुढचं पाऊल
दरवर्षी एक विषय घेऊन त्यावर दिवाळी विशेषांक प्रकाशित करणे ही ‘पुढचं पाऊल’ची खासियत आहे. सर्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘पुढचं पाऊल’ हा यंदाचा दिवाळी अंक ‘चेहरे’ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘चेहरा’ हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे चेहऱ्यावरील ‘स्फुट’ लिखाण वाचनीय आहे. प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी पुस्तकाचा किंवा अंकाचा चेहरा असलेले ‘मुख’पृष्ठ साकारताना चित्रकारांच्या मनात काय भावना असतात ते रंजकपणे मांडले आहे.
पुरातन मूर्तीचा चेहरा साकारताना कशा प्रकारे वज्रलेप करतात, त्यामागे काय शास्त्र असते, हे वज्रलेपकार अशोक ताम्हणकर यांनी उलगडून दाखवले आहे. विचारशक्ती कशी पणाला लावावी हे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी दाखविले आहे.
संपादक : ऋतुजा पोवळे
किंमत : ८० रुपये.