दर्याचा राजा
सागरी जीवनाला वाहिलेला आणि साहित्य फराळाने सजलेला हा अंक आहे. कथा, काव्यांगण, बालांगण, वैचारिक लेख, विनोदी कथा, भविष्यवाणी, क्रीडा, नाटय़ सिनेमा, मत्स्य विभाग, आरोग्य, परीक्षण, सुवर्णकण असे विविधरंगी अंतरंग या अंकात मिसळून गेले आहेत. मधु मंगेश कर्णिक, जयवंत कोरगावकर पंढरीनाथ तामोरे, डॉ. विजया वाड, प्रा. वि. शं. चौघुले, अशोक बेंडखळे आदींच्या कथा, लेख विचारमंथन करतात. सुधाकर सामंत यांचा ‘गाडगेबाबांच्या सान्निध्यात’ हा भक्तीपर लेख तर डॉ. रजनी अपसिंगेकर यांची ‘काय कमाल आहे’ ही विनोदी कथा अप्रतिम आहे. श्रीराम जोशी यांनी वार्षिक राशिभविष्य सांगितले आहे.
‘मन्ना डे’ यांच्यावर सदानंद बामणे यांनी केलेले भाष्य तर मत्स्य विभागात पारंपरिक मच्छीमारी काळाच्या पडद्याआड, खोल समुद्रातील मासेमारी याबाबतचे गांभीर्य प्रा. सूर्यकांत येरागी, हरेश्वर मर्दे यांनी चर्चेला आणले आहे.
संपादक : पंढरीनाथ तामोरे किंमत : ७५ रुपये.
****
कलामंच
सुप्रसिद्ध लेखक, कवी चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ प्रकाशित होणाऱ्या ‘कलामंच’ दिवाळी अंकात अभिनेत्री स्पृहा जोशी हिची मुलाखत हे खास वैशिष्टय़ आहे. याशिवाय नामवंतांच्या कविता, लघुकथा, विनोदी किस्से यामध्ये आहेत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम व नाटय़कर्मी भालचंद्र पेंढारकर यांना आदरांजली वाहणारे लेख आहेत. सुपुत्र हो! आम्हाला वृद्धाश्रमात ठेवू नका हा सौ. अंजली दाबके यांचा लेख आजच्या पिढीला खूप काही सांगून जातो.
संपादक : हेमांगी अरविंद नेरकर
****
श्री धन्वंतरी
आरोग्यविषयक माहिती देणारा श्री धन्वंतरीचा यंदाचा अंक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे याबाबत माहिती देणारा विशेषांक आहे. डॉ. बी. के. गोयल यांचा हृदयरोगाबाबत कशाप्रकारे काळजी घ्यावी, काय पथ्य पाळावी याबाबतचा लेख हा माहितीपूर्ण आहे. अ‍ॅक्युपंक्चर, जेनेरिक औषधे, चाळीशीनंतर सांभाळावयाचे पथ्य याबाबतची माहिती या अंकात देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषयीही माहिती या अंकात असून हा अंक वाचकांना दिवाळीतही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे. डॉ. तेजल वाघुले, डॉ. अभय कानेटकर, डॉ. अमित दांदळे यांचे लेखही माहितीपूर्ण आहेत. प्रा. हेमंत सामंत यांचा दिनचर्या आणि ऋतुचर्या याबाबतचा लेख वाचनीय झाला आहे.
संपादक : शुभांगी गावडे किंमत : ८० रुपये.
****
भक्तिसंगम
भक्तिमार्गाला संपूर्णपणे वाहिलेला हा अंक असून विविध संतांची माहिती या अंकात देण्यात आली आहे. सती मदालसा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी, ज्ञानदेव यांच्याबरोबरच साईबाबांच्या बालपणावर टाकण्यात आलेला नवा प्रकाश आदी लेखांमुळे हा अंक वाचनीय झाला आहे. भक्तिमार्गातील वाचकांच्या संग्रही राहणाऱ्या या अंकात अवयवदानाविषयीही माहिती देण्यात आली आहे.
संपादक : सुधाकर सामंत किंमत : ५० रुपये.
****
उत्तम अनुवाद
‘उत्तम अनुवाद’ हा अनुवादित साहित्यासाठीचा विशेष दिवाळी अंक आहे. भारतीय आणि जगभरातील इतर भाषांमधील उत्तम साहित्य देण्याचा प्रयत्न या अंकात केलेला आहे. या अंकात प्रवास या विभागांतर्गत असलेले काही लेख निबंधाच्या स्वरूपात, काही आत्मकथनात्मक तर काही ललित वाङ्मयप्रकारात आहेत. काही लघुनिबंध आणि लघुकथा यांच्या सीमारेषेवरचे आहेत. अशा लेखांचे वर्गीकरण करणे अवघड असते. भारतीय कथांमध्ये अपरिचित या मोहन राकेश यांच्या हिंदी कथेचा चिन्मय पाटणकर यांनी अनुवाद केला आहे. तसेच ‘अमृतसर आलं आहे’, ‘एक प्रवास असाही’ आणि ‘तरंग बासुरीचे’ या कथांचाही समावेश आहे. ‘एक मळलेली पायवाट’, ‘पर्यटक’, ‘भटकंती’, ‘द लगून’ या परदेशी कथांचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. ‘द हनीमून- प्रवास दोन मधुचंद्रात’ या पर हॉलस्ट्रॉम यांच्या स्वीडिश कथेचा का. द. सरदेशमुख यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
दीर्घ कथेतील ‘तारकासमूहाचं रहस्य’ ही शिनइचि होशी यांची जपानी कथा निसीम बेडेकर यांनी अनुवादित केली असून वाचकांना आनंद देणारी आहे. प्रवास आणि कथांचा समावेश असलेला हा अंक वाचकांच्या पसंतीस उतरेल.
संपादक : अभिषेक जाखडे किंमत : १५० रुपये.
****
आश्लेषा
‘आश्लेषा’ दिवाळी अंक विविधतेने सजलेला आहे. या अंकात ‘मोजकी उन्हे’ ही इब्राहिम अफगाण यांची कादंबरी वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. ‘व्हीलचेअर’, ‘मातृसत्ताक’, ‘मायामाती’ या कथाही वाचनीय आहेत. ‘भैसोवाला टोला’, ‘कलाकार आणि इतिवृत्त’ या अनुवादित कथांची योग्य मांडणी करण्यात संपादक यशस्वी ठरले आहेत. ‘मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ’ हा आसावरी जोशी यांचा विशेष लेख आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता चिन्मय मांडलेकर, नृत्यांगणा अदिती भागवत, नामवंत चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रशेखर वझे यांच्या मुलाखती हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे आणि विविध कवींच्या कविता यांमुळे हा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरेल असाच आहे.
संपादक : अशोक तावडे
किंमत : १४० रुपये.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा