23 October 2019

News Flash

दिवाळी अंकांचे स्वागत..

अरविंद पोहकर यांनी ‘दिवा करजो भाताचा’ या लेखातून जुन्या काळातील दिव्यांचा सण उलगडला आहे.

सामना
‘सरकारी तसबिरीत नसलेले बाळासाहेब’ या लेखातून संजय राऊत यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अरुण म्हात्रे यांनी ‘ते दिवस गेले कुठे?’ या लेखातून मुंबईतील पूर्वीच्या दिवाळसणाची वैशिष्टय़े मांडली आहेत. अरविंद पोहकर यांनी ‘दिवा करजो भाताचा’ या लेखातून जुन्या काळातील दिव्यांचा सण उलगडला आहे.
शिरीष कणेकर यांनी अश्लील विनोदांवर लिहिलेला लेख वाचकांचे मनोरंजन करणारा आहे. अरुण भालेराव (मराठीचे खोटे मित्र), ज्ञानेश्वर कटारे (कोर्ट मार्शल), राजेश मंडलिक (विमानातील फन डे), डॉ. श्रीकांत नरुले (लावणी ठेका..), प्रवीण दवणे (लाइफ मॅनेजमेंट), दशरथ पाटील (सामानगडचा संग्राम), विनय खंडागळे (क्वेस्ट), रामकृष्ण अभ्यंकर (वाघा बॉर्डर), सुरेश राऊत (हिंदुस्थानी संस्कृती आणि वेदाक्षरे) हे लेख वाचनीय आहेत.
संपादक : उद्धव ठाकरे
किंमत : ८० रुपये.

कान्हेरी
विविध विषयांचा वेध घेतलेला यंदाचा ‘कान्हेरी’ दिवाळी अंक वाचनीय आहे. सुधीर जोगळेकर यांनी ‘स्वयंभू ते स्वयंपूर्ण : देवेंद्र फडणवीस’ या लेखातून फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. दिवाकर देशपांडे यांनी आपल्या लेखातून १९६५ च्या भारत-पाक युद्धातील जवानांच्या पराक्रमाचे स्मरण केले आहे. ऋतुजा रानडे, संजीव साबडे, रवींद्र मांजरेकर, गणेश कदम आणि नितीन चव्हाण यांनी मुंबईतील विविध विषयांवर केलेले लिखाण वाचनीय आहे. हर्षल मळेकर यांनी भाऊ कदम यांची ‘भरारी’ या लेखातून गुणी कलाकाराची कारकिर्द रंगविली आहे. महेश विचारे यांनी अजिंक्य रहाणेचे महत्त्व लेखातून विषद केले आहे. कथा, कविता यांच्या समावेशाने अंक वाचनीय ठरला आहे.
संपादक : रामकृष्ण जोगळेकर
किंमत : १०० रुपये.

साहित्य मैफल
देशात राजकीय पक्षांकडून सहिष्णुता आणि असहिष्णुता यांचे माजवण्यात आलेल्या अवडंबराचे मार्मिक विश्लेषण ‘साहित्य मैफल’ दिवाळी अकांचे संपादक कुमार कदम यांनी प्रस्तावनेत केले आहे. त्यातूनच अंकाची मांडणी कशा स्वरूपाची असेल यांची पुसटशी कल्पना वाचकाला येते. अंकाच्या सुरुवातीलाच सामान्य माणसांची असामान्य गोष्ट मांडताना कितीही संकटे आली, शारीरिक व्याधी असल्या तरी जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन मांडण्यात ‘साहित्य मैफल’ यशस्वी झाला आहे. यानंतर उत्तरोतर अंकातील प्रत्येक कथेतून माणसामाणसांमधील स्वभावातील विविध कंगोऱ्यांना हात घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘नात’, ‘प्रूफरीडर’, ‘संबंधासंबंधाची गोष्ट’ या कथांमधून सुरू झालेला हा प्रवास ‘प्रायश्चित्त’, ‘तृप्तता’, ‘मालती’ या कथांमधून पुढे सुरू राहतो. विशेष म्हणजे अंकातील प्रत्येक कथेत शेवट कसा असेल याबाबत वाचक अधिक आतुर असतो आणि ही आतुरता टिकवून ठेवण्यात संपादकांना यश आले आहे. यासाठी कथेची भाषा आणि मांडणी पण तितकीच महत्त्वाची ठरली आहे.
संपादक : कुमार कदम
किंमत : ९० रुपये.

गंधाली
बाळ राणे यांची भागधेय, डॉ. अलका कुलकर्णी यांची धर्मयुद्ध, रमाकांत देशपांडे यांची डॉक्टर.. मला ती हवी आहे या कथांनी सजलेला. अरुण डावखरे यांची अनुवादित कथा, कैलास रायभान दौंड यांची तुडवण ही दीर्घकथा, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, दमयंती भोईर, वसंत वाहोकर, अनुपम बेहेरे, यांच्या कविता आणि विवेक मेहेत्रे यांची व्यंगचित्रे असा संपूर्ण बाज असलेला यंदाचा ‘गंधाली’ दिवाळी अंक वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे. यात कविता दोन भागांत दिल्या आहेत.
संपादक : डॉ. मधुकर वर्तक
किंमत : १८० रु.

साभार पोच..
नरामप्रहार (संपादक : मदन बडगुजर), उद्योगश्री (संपादक : भीमाशंकर कठारे), चतुरंगी हास्य (संपादक : विवेक म्हेत्रे), अर्थशक्ती (संपादक : रमेश नार्वेकर), उद्योजक (संपादक : पी.पी. देशमुख), शब्दोत्सव (संपादक : अभिजीत जोंधळे), शब्दरुची (संपादक : सुदेश हिंगलासपूरकर), युगादेश (संपादक : लक्ष्मीकांत जोशी).

First Published on December 3, 2015 2:25 am

Web Title: welcome to diwali magazine 4