टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापुरात बुधवारी सकाळी दाखल झाला. तुळजापूर वेशीत सोलापूरकरांनी या पालखीचे उत्साहाने स्वागत केले.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा ऊन, वारा झेलत मजल-दरमजल करीत सकाळी तुळजापूरमार्गे शहरात आला. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तुळजापूर वेशीजवळ श्री रुपाभवानी मंदिर चौकात महापौर अलका राठोड यांनी सोलापूरकरांच्यावतीने पालखीचे स्वागत केले. सर्वत्र वरूणराजाची कृपा होऊन सोलापूरकरांना मुबलक पाणी मिळावे, अशी प्रार्थना आपण गजानन महाराजांच्या चरणी केल्याचे महापौर राठोड यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांच्या हस्ते पालखीतील श्री गजानन महाराजांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री, नगरसेवक सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, माजी नगरसेविका लता फुटाणे, अस्मिता गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शाहू शिंदे आदींनी पालखीचे दर्शन घेऊन या पालखी सोहळ्यातील शेकडो वारकऱ्यांचे स्वागत केले. सोरेगावच्या गजानन महाराज देवस्थान विश्वस्त मंडळाच्यावतीनेही या पालखी सोहळ्याचे स्वागत झाले. यावेळी विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शेगाव येथून ७ जून रोजी निघालेल्या या पालखी सोहळ्यात ६५०वारकरी असून त्यात सुमारे ३५० गणवेशधारी व १५० जण भगवे पताकाधारी आहेत. तीन अश्व, संगीत बॅन्ड पथक, तसेच रूग्णवाहिका असा लवाजमा आहे.
यंदा वरूणराजाने अवकृपा केल्यामुळे जून महिना पावसाअभावी कोरडाच गेला. ग्रामीण भागात शेतकरी चिंताग्रस्त असून सर्वाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर दुष्काळाचे संकट पुन्हा कोसळणार की काय, या चिंतेने सर्वानाच ग्रासले आहे. हे चिंतेचे सावट क्षणभर बाजूला ठेऊन देवावर हवाला ठेऊन भाविकांनी श्री गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी अनेक घरांपुढे सडासमार्जन करुन रांगोळ्या व पायघडय़ा घातल्या. ‘श्री’ चे दर्शन आणि पूजेसाठी भाविकांची अक्षरश झुंबड उडाली होती. स्वागतानंतर पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी थांबला होता.
पालखी सोहळ्यात एरव्ही अग्रभागी असणारी श्री गजानन महाराज संस्थानाची हत्तीण (गजराणी) दुर्दैवाने तीन महिन्यांपूर्वी मृत्युमुखी पडल्याने तिची अनुपस्थिती जाणवली. मानाचे अश्व, टाळ-मृदंगासह भजन व भक्तिगीतांचा निनाद, विठ्ठल-रखुमाई,ज्ञानेश्वर-तुकाराम, संत गजानन महाराजांच्या नामाचा गजर, सोबत शेकडो वारकरी व फडकऱ्यांची शिस्तबध्दता, विशेषत भागवत धर्माच्या उंच फडकणाऱ्या पताका यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते. रणरणत्या उन्हात हळूहळू चालत आणि भाविकांचे स्वागत स्वीकारत हा पालखी सोहळा तुळजापूर वेशीतून कस्तुरबा भाजी मंडई, सम्राट चौक मार्गे दुपारी उशिरा श्री प्रभाकर महाराज मंदिरात जाऊन विसावला होता. भोजन व विश्रांतीनंतर हा पालखी सोहळा सायंकाळी ठरलेल्या मार्गावरुन रविवार पेठेतील कुचन प्रशालेत जाऊन रात्रीच्या मुक्कामासाठी विसावला.
उद्या गुरूवारी सकाळी ‘श्री’ची पालखी शहरातील विविध मार्गावरुन फिरुन सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयात रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचणार आहे. नंतर तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी सकाळी रेल्वे स्थानक, भैय्या चौक, मरिआई चौक, देगाव नाका,तिऱ्हेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.