नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात गुलाब फुलांची भेट यामुळे ओठात हसू तर पालकांच्या अल्पवियोगाने डोळ्यात आसू घेऊन आलेल्या मुलांनी सोमवारी सव्वा महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा गजबजल्या.
प्राथमिक शाळांच्या नव्या वर्षांची सुरुवात सोमवारी मोठय़ा उत्साहात झाली. शाळकरी मुलांचे शिक्षकांनी सडा-रांगोळी काढून व प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र केलेल्या मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुलांना पहिल्याच दिवशी सर्व  शिक्षा अभियानांतर्गत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येत होते.
नवीन शाळेत, नवीन तुकडीत नव्या ओळखी करण्यात बालचमू दिवसभर मग्न होता. आज शिकविण्यापेक्षा पुस्तकवाटप करण्यात शिक्षकांचा वेळ जास्त गेला. मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज मुलांचे कौतुक करण्याबरोबरच स्वागत करण्यातही जाणती मंडळी मग्न होती. अनेक शाळेत पहिल्याच दिवशी शाळेत जाणा-या मुलाला सोडण्यासाठी पालकवर्ग सोबत आला होता. शाळेच्या फाटकापर्यंत सोडत असताना बालचमू सातत्याने पाठीमागे वळून पहात असल्याचे चित्र अनेक शाळेत दिसत होते.