राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याच्या निर्णयाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे. तसेच सरकारवर कुरघोडी करताना ही कमी केलेली सुरक्षा व्यवस्था राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ती रोखण्यासाठी वापरा असा सल्ला दिला आहे.

पाटील म्हणाले, “त्या त्या काळात वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार या सुरक्षा व्यवस्था दिल्या होत्या. त्या सध्याच्या सरकारने काढून घेतल्या आहेत त्याचे मी स्वागत करतो. पण मी असंही म्हणेनं की, महाराष्ट्रात महिला खूपच असुरक्षित झालेल्या आहेत. त्यामुळे ही काढलेली सुरक्षा महिलांना पुरवली पाहिजे”

“जर सरकारची कल्पना असेल की अशा प्रकारे सुरक्षा काढल्यामुळे आमचे प्रवास थांबतील, आम्ही घाबरु. तर असं होणार नाही. आम्ही चळवळीतीलच माणसं आहोत. त्यामुळे सुरक्षा काढल्याने काही आम्ही घाबरत नाहीत. कार्यकर्त्यांचं सुरक्षा कवच हे गावोगाव आहेच. मुळात राजकीय-सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा हे आम्ही गृहितच धरलं होतं की कुठेतरी आपली गाडी अडवली जाणार, पण त्यामुळे आम्ही घाबरत नाही,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेवरुन सरकारवर टीका करताना हे जे काही चाललं आहे ते आकसानं आणि सूडबुद्धीने चाललं असल्याचा आरोपही पाटील यांनी सरकारवर केला आहे. तसेच यातून काही निष्पण्ण होईल असं मला वाटत नाही, असंही ते म्हणाले. राज्यात रोज किमान चार महिला अत्याचारांचे प्रसंग घडत आहेत. मतिमंद-गतीमंद मुलींवरचे अत्याचार वाढत आहेत, तिथेही सुरक्षा वाढवली पाहिजे. करोनाच्या काळात मी आणि आम्ही सर्वांनीच स्वतःहूनच सुरक्षा कमी होती, अशी माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.