‘विद्यार्थीच माझा गुरू’ संकल्पनेतून प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न

निखिल मेस्त्री, पालघर

पालघर : टाळेबंदीत शाळा बंद असल्या तरी पालघर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमधील समाजमंदिरेच शिक्षणाची केंद्रे बनत आहेत. या समाजमंदिरांमधून गावातील विद्यार्थीच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया पक्का करीत आहेत. कांद्रेभुरे येथील प्रमुख शिक्षिका जागृती चौधरी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थीच माझा गुरू या शैक्षणिक संकल्पनेला यश येत आहे.

कांद्रेभुरे हे गाव सफाळेच्या दुर्गम भागात असून येथील शाळा डोंगराच्या पायथ्याशी आहे. करोनाकाळात ही शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना अभ्यासाचे विस्मरण होऊ नये यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया या उपक्रमातून पक्का करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पालक व गावातील नागरिक या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत असून मदतही करीत आहेत. विशेष म्हणजे गावातील नववी-दहावीचे विद्यार्थीच या प्राथमिक विद्यार्थ्यांचे गुरू आहेत. विद्यार्थीच माझा गुरू या संकल्पनेतून येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना समूहाने सामाजिक अंतर राखून समाजमंदिर, घराचे ओटे येथे शैक्षणिक धडे दिले जात आहेत. येथे या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान, गणिती क्रिया याचबरोबरीने प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते. पहिली ते चौथी इयत्तेत असलेले २५ विद्यार्थी दररोज या माध्यमातून एक ते दीड तास शिक्षण घेत आहेत.

शिक्षणाचा वसा दोन महिन्यांपासून अखंडित

लोकप्रतिनिधी, प्रमुख शिक्षिका, नागरिक यांच्या सहकार्याने हे शिक्षण गेल्या दोन महिन्यांपासून अखंडित सुरू आहे. विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी शिक्षण देण्यासाठी उभ्या केलेल्या स्वयंसेवक समूहात दुर्गेश भोईर, करण पाटील, दिव्यांका धोकावकर, ऋतुजा सुमडा, वृषाली काटेला, मनीषा पाटील हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत इतर भागातही असे शिक्षण सुरू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा त्यांना फायदा होईल.

शाळा बंद आहेत त्यातच काही विद्यार्थ्यांचे पालक अशिक्षित असून त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेत या गावातील विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सुरू केलेला हा शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहे. मुले आनंदाने दररोज शिक्षण घेत असल्याचा आनंदही आहे. जगदीश पाटील, सरपंच, कांद्रेभुरे