कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळेच सांगली जिल्ह्यात भयावह पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने सांगूनही कर्नाटक सरकार धरणातून पाणी सोडत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला आहे. दोन्ही राज्य सरकारांमध्ये योग्य समन्वय असून सध्या ५ लाख ३० हजार क्युसेक वेगाने (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) पाण्याचा विसर्ग केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सांगली जिल्ह्यातील पुरपरिस्थितीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. तसेच बचाव पथक आणि जिल्हा प्रशासनाकडून मदत मोहिमेची माहिती घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अलमट्टी धरणाच्या फुगवट्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुसळधार पाऊस आणि वरच्या धरणातून पाणी सोडल्याने अचानक परिस्थिती गंभीर झाली. त्यात अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने कर्नाटकातील काही गावांना पुराचा फटका बसणार होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बोलून आधी तीन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जसजसे पाणी वाढत गेले तसा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. केंद्राकडूनही मदत मागण्यात आली आहे. सकाळीच नेव्हीच्या १३ पथकाना पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीनुरूप प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.