वाढत्या असहिष्णुतेविरोधात आवाज उठविणाऱ्या साहित्यिकांनी शुक्रवारी थेट मंत्रालय गाठून सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुरस्कार आणि त्याची रक्कम परत करण्यासाठी प्रज्ञा दया पवार, गणेश विसपुते, संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद मालशे, उर्मिला पवार, येशू पाटील, मुकुंद कुले हे साहित्यिक मंत्रालयात आले होते. मात्र, फडणवीस पूर्वनियोजित दौऱ्यानुसार मुंबईबाहेर असल्यामुळे या साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांकडे पुरस्कार आणि त्याची रक्कम परत केली.
साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा कित्ता महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी गिरविला आहे. या साहित्यिकांनी महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले पुरस्कार रोख रकमेसह परत करण्याचा निर्णय याआधीच घेतला होता. दादरी घटना, राज्य घटनेच्या मूल्यांवरील घाव, संस्कृतीला जाणीवपूर्वक दिला जाणारा रंग, विचार आणि विचारवंतांची हत्या या पार्श्वभूमीवर आपण हे पुरस्कार आणि मिळालेली रोख रक्कम परत करत असल्याची भूमिका साहित्यिकांनी घेतली.
सरकारकडून मिळालेले सर्व पुरस्कार व मिळालेली १ लाख १३ हजार रुपयांची रक्कम परत करत असल्याचे प्रज्ञा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. मुद्दा केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, जीविताच्या सन्मानपूर्व रक्षणाचा नाही तर राज्यात शासन व्यवस्थेकडून सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरील घाला तसेच राज्य घटनेच्या पायाभूत मूल्यांवर घाव घालण्याच्या निषेधार्थ आपण पुरस्कार परत करत असल्याचे पवार यांनी नमूद केले होते.
असंवेदनशीलता वाढत चालली असून, धर्मांधता टोकाला पोहोचली आहे. समाज कलुषित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे साहित्यिक व कलावंतांनी पुरस्कार परत करण्याचे अहिंसक पाऊल उचलले आहे. त्याला पाठिंबा व या सगळ्याचा निषेध म्हणून मला मिळालेला पुरस्कार व पन्नास हजार रुपये ही पुरस्काराची रक्कम परत करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे संभाजी भगत यांनी म्हटले आहे.