पश्चिम बंगालच्या विजयाची मशाल संपूर्ण देशात एक नवा प्रकाश निर्माण करेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. “एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये खूप मेहनत घेतली. भाजपाने सर्वांना काम लावलं होतं, पण तरीही ममतादीदी भारी पडल्या. ममता जमिनीशी जोडलेल्या असून आजही जनतेवर त्यांचा प्रभाव आहे हे दिसलं आहे. तुम्ही सभा घेतल्या, रॅली काढल्या, पैसा ओतला हे दिसत आहे, तरीही लोकांनी पश्चिम बंगालची लेक ममता बॅनर्जी यांच्याकडे सत्तेची कमान सोपवली आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देशात करोनाचं सकंट असतानाही प्रोटोकॉल तोडून रोड शो, रॅली, शक्तीप्रदर्शन होत होतं. सगळा देश करोनाशी लढत असताना तिथे भाजपा ममतांचा पराभव करण्यासाठी लढत होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बदल्यात तुम्ही करोना दिला आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा दिल्लीतून येऊन कोणत्याही राज्यात दादागिरी सहन केली जाऊ शकत नाही हे दाखवलं आहे. मग ते महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा मग पश्चिम बंगाल असो. तेथील जनता, प्रादेशिक पक्ष देशाचं राजकारण ठरवणार हा संदेश गेला आहे,” असं ते म्हणाले.

“प्रधानमंत्री मोदींनी करोनाची लढाई सोडून पश्चिम बंगालमध्ये व्यस्त राहणं योग्य नव्हतं असं मला वाटतं. पक्ष लढत असतो पण जेव्हा पंतप्रधान उतरुनही पराभव होतो तेव्हा त्याचं खापर त्यांच्यावरच असतं. हे देशासाठी ठीक नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही बदल होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा खूप मोठा विजय होईल आणि महाराष्ट्रात भूकंप येईल अशी अफवा पसरवली जात होती. पण असं झालेलं नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भावनेने एकमेकांशी जोडलेला आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र नेहमी राष्ट्रहितासाठी लढले आहेत. यापुढेही आम्ही सोबत असू. उद्धव ठाकरे यांनीही ममता बॅनर्जींच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.