पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अकोला मतदारसंघातून सलग चारवेळा मोठय़ा मताधिक्याने विजय प्राप्त करणाऱ्या खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांची मंत्रिपदी वर्णी लागली. संजय धोत्रेंच्या रूपाने अकोला मतदाररसंघाला मोठय़ा प्रतीक्षेनंतर केंद्रीय मंत्रिपदाचा बहुमान मिळाला.

लोकसभा निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांनी स्वत:चा दोन लाख तीन हजारांचा विक्रम मोडीत काढत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला. अकोला मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा विजयाचा हा पराक्रम ठरला. या विजयात संजय धोत्रेंनी विदर्भात सर्वाधिक मताधिक्य घेतले. यामध्ये त्यांनी नितीन गडकरी यांनाही मागे सोडले. अकोला मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून येण्याचाही विक्रम त्यांनी रचला. या पराक्रमी विजयाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षनेतृत्वाने त्यांची थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लावली. अकोला मतदारसंघाला मोठय़ा प्रतीक्षेनंतर केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे जिल्हय़ात उत्साहाचे वातावरण आहे. पश्चिम विदर्भाला आनंदराव अडसूळ यांच्यानंतर १५ वर्षांने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

१९५९ मध्ये अकोला जिल्ह्यतील पळसो बढे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या संजय धोत्रे यांनी अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल पदवी घेतली. गेल्यावर्षी त्यांनी वकिलीचीही पदवी प्राप्त केली. विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेत विद्यार्थी प्रतिनिधीपासून ते थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा संजय धोत्रे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. १९९९ मध्ये मूर्तिजापूर विधानसभामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार म्हणून पहिला विजय प्राप्त केला. त्यानंतर सलग चारवेळा अकोल्याचे खासदार पद त्यांनी भूषवले.

संजय धोत्रेंच्या संघटन कौशल्यामुळे जिल्हय़ात भाजपचा विस्तार झाला. पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून त्यावर धोत्रेंचा कायम दबदबा राहिला. धोत्रे यांनी जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रत्येक गावात त्यांनी कार्यकर्ता जोडण्यासाठी काम केले. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा सफाया झाला. महापालिका निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले. उत्कृष्ट नियोजनामुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळवून दिले. लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या निमित्ताने संजय धोत्रेंचे राजकीय वजन वाढले. त्याची प्रचिती आली असून, धोत्रेंच्या गळय़ात थेट मंत्रिपदाची माळ पडली. या माध्यमातून पश्चिम विदर्भातील नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. संजय धोत्रेंना कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि महाबीजसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी भरपूर कार्य केले. नीळकंठ सूतगिरणीची पुनर्बाधणीही त्यांच्या पुढाकारातून करण्यात येत आहे.

विविध पदांवर उल्लेखनीय कार्य

संजय धोत्रे यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली. २०१८ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तत्पूर्वी ते महाराष्ट्र राज्य रोजगार निवड मंडळाचे सदस्य होते. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण समितीवर असताना त्यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. २००४ पासून ते अकोला येथे रेल्वेच्या अंदाजपत्रक समितीवर कार्यरत आहेत.

पंतप्रधान नरेंद मोदी व पक्षनेतृत्वाने कार्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. हा बहुमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचा आहे.

– संजय धोत्रे, केंद्रीय मंत्री.