मोहन अटाळकर

यंदाचा पावसाळा समाधानकारक दिसून येत असला, तरी परतीच्या पावसाने जो धिंगाणा घातला, त्याने मात्र शेतकऱ्यांच्या उत्तम खरिपाच्या आशेवर संपूर्णपणे बोळा फिरवला. कापणीला आलेले सोयाबीन आणि वेचणीला आलेल्या कपाशीची रया घालवली. अतिपावसाने आणि आता बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान हे सोयाबीन-कापूस पट्टय़ात शेतकऱ्यांना अत्यंत विदारक स्थितीकडे नेणारे आहे, हा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित यवतमाळ येथील सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे, प्रा. डॉ. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत आणि प्रा. प्रशांत कराळे यांच्या संशोधक गटाने केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अमरावती आणि मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्यातील ४३२ शेतकऱ्यांचा हा अभ्यास आहे.

हवामान बदलामुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना त्याचा अनुभव येत आहे. शेती ही बेभरवशाची झाली आहे. शेतकऱ्यांकडील पारंपरिक बियाणे संपवीत त्याला बियाणे कंपन्यांवर अवलंबून राहण्यासाठी भाग पाडणाऱ्या धोरणामुळेही मोठे नुकसान झाले आहे. यंदा हजारो शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. त्यातच विषाणूजन्य रोगांचा फटका बसला. अतिपावसामुळे प्रत खालावली. दाणे बारीक निघाले आणि स्वाभाविकच एकरी उत्पादन घसरले. यंदा सोयाबीनचे भाव तेजीत असले, तरी बहुतेक शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी सोयाबीन नाही. सोयाबीनची ही स्थिती, तर प्रमुख नगदी पीक कपाशी ज्यावर एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च होतो, तिची स्थिती आणखीच वाईट आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या आशा कपाशीवर केंद्रित झालेल्या असताना १८ ऑक्टोबरपासून बोंडअळीच्या प्रादुर्भावाच्या तक्रारी येऊ लागल्या. निकोप दिसणाऱ्या बोंडात गुलाबी बोंडअळी आणि तिने बोंड आतून किडके करून टाकल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. २०१७-१८ मध्ये हीच बोंडअळी डिसेंबरमध्ये सापडली, तेव्हा शेतकऱ्यांचा ६० ते ७० टक्के कापूस निघाला होता. यंदा मात्र सीतादही (पहिल्या वेचणीच्या वेळी केली जाणारी पारंपरिक पूजा) होताच बोंडअळीचे संकट दिसून आले. यंदा बोंडअळीमुळे ७० ते १०० टक्के नुकसान होईल, असे सांगणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. एकरी किमान दहा क्विंटल कोरडवाहू शेतातून तर अकरा क्विंटलच्या वर सिंचित शेतात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात यंदा फारसा कापूस येणार नाही, असे स्पष्टपणे दिसते आहे. अतिपावसामुळे आधीच भरीव बोंडे सडून गेल्याने झालेले नुकसान आणि आता बोंडअळीमुळे झालेली हानी यातून शेतकरी कसा सावरेल हा प्रश्नच आहे, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालातील शेतकऱ्यांची मते

अभ्यास अहवालात शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, दरवर्षी किमान १० ते १५ टक्के शेतकऱ्यांना सदोष बियाण्यांचा फटका बसतोच. यंदाच्या हंगामात तर जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यांबाबत हा अनुभव आला. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. आर्थिक नुकसानीसोबतच हंगामातील महत्त्वाचे दिवसही वाया गेले. रोगराईमुळे शेतमालाच्या उत्पन्नात घट येते. नुकसानीला सामोरे जावे लागते. सोयाबीनवरील कीडरोगांमुळे उत्पादनावर गेल्या पाच वर्षांत दरवर्षी १५ ते २० टक्के नकारात्मक परिणाम झाल्याची नोंद शेतकऱ्यांनी अभ्यास अहवालात केली आहे.

अतिपावसामुळे झालेल्या हानीमुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, लांबलेल्या पावसामुळे तूर पिकाला बहरासाठी आवश्यक ताण न बसल्याने उपाय म्हणून काय करावे, याची शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, सदोष बियाण्यांबाबत संबंधित कंपन्यांवर कारवाई व्हावी, बोंडअळीच्या संदर्भात फसवे दावे करणाऱ्या बीटी बियाणे कंपन्यांवर शासनाने कठोर फौजदारी करावी. सोयाबीन पिकासाठी पर्यायी पीक शोधणे गरजेचे आहे, अशा सूचना शिफारशी अभ्यास अहवालात करण्यात आल्या आहेत.

सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनमधून नवा पैसाही मिळणार नाही. त्यातीलच ५० टक्के शेतकऱ्यांना बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली होती. बीटी कापूस बियाणे कंपन्यांनी नव्या तंत्रज्ञानाची ग्वाही देऊन बोंडअळी ९० दिवस येणार नाही, असे दावे करूनही सत्तराव्या दिवशीच बोंडअळी कपाशीवर आली. बोंडअळी ही अशी कीड आहे की, एवढय़ा लवकर जर कपाशीवर आली, तर कापसाचे ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.

– प्रा. घनश्याम दरणे, शेती अभ्यासक