News Flash

प. महाराष्ट्रातील बंद ८ नाक्यांची चंद्रपूर जिल्ह्य़ातून टोलवसुली!

पश्चिम महाराष्ट्रात बंद केलेल्या आठ पथकर नाक्यांची टोल वसुली मात्र चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडाळी पथकर नाक्यावर केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

| August 9, 2014 08:59 am

पश्चिम महाराष्ट्रात बंद केलेल्या आठ पथकर नाक्यांची टोल वसुली मात्र चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडाळी पथकर नाक्यावर केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ते विकास महामंडळाच्या नियमानुसार २०१३ मध्ये बंद होणारा ताडाळी पथकर नाका आता २२५.६६ कोटी रुपये वसूल झाल्यानंतरच २०२६ मध्ये बंद होणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गाजावाजा करून राज्यातील ४४ पथकर नाके बंद केल्याची घोषणा केली. त्यात विदर्भातील एकही पथकर नाका नाही. याउलट, पश्चिम महाराष्ट्रातील दौंड, फुरसंगी, जेजुरी, खेडगाव, नालासोपारा, परभणी, मूर्तीजापूर व नांदगाव व अन्य एक, असे आठ पथकर नाके बंद केले. मात्र, तेथील पथकर वसुली या जिल्ह्य़ातील चंद्रपूर-नागपूर मार्गावरील ताडाळी येथील पथकर नाक्यावर केली जात आहे. गेल्या १५ वषार्ंपासून या पथकर नाक्यावर टोल वसुली सुरू आहे. ती बंद व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. तेव्हा तांत्रिक कारण समोर करून १४ सप्टेंबर २०१२ मध्ये टोल वसुली बंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वसुलीस सुरुवात झाली. आता हा पथकर २०१६ पर्यंत सुरू राहील, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात २०२६ पर्यंत वसुली केली जाणार आहे.
येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस यांनी या अवैध वसुलीचा पाठपुरावा केला असता पश्चिम महाराष्ट्रात बंद केलेल्या आठ पथकर नाक्यांची वसुलीही याच ताडाळी नाक्यावरून केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीओटी तत्वावर दौंड येथे १७.४७ कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला होता. त्याच पध्दतीने फुरसुंगी येथे २७.३४३ कोटी, जेजुरी येथे ११.०५, खेडगाव येथे १५.२१, नालासोपारा येथे ६.१३, परभणीत १६.०९, ताडाळी ५०.२४, मूर्तीजापूर ५.२६ व नांदगाव येथे ४.५२ कोटी खर्च करण्यात आले होते. यावर झालेला खर्च व त्यावरील १६ टक्के व्याजासह कंत्राटदार टोल वसुली करीत होता. राज्य शासनाने हे आठ पथकर नाके बंद करतांना तेथील टोल या जिल्ह्य़ातील ताडाळी पथकर नाक्याकडे वळता केला. त्यामुळे या जिल्ह्य़ातील वाहनचालकांना नाहक भरुदड सहन करावा लागत आहे.  
 दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे हित जपतांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भ व त्यातल्या त्यात चंद्रपुरातील जनतेवर अन्याय केल्याने हा पथकर नाका तातडीने बंद करावा, या मागणीसाठी लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार शोभा फडणवीस यांनी दिली. या पथकर नाक्यावर पहिले सात ते आठ कोटींची वसुली व्हायची, परंतु आता वाहनसंख्या वाढल्याने गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे १२, १२.५० व १४ कोटींची वसुली करण्यात आलेली आहे. २०२६ पर्यंत हा पथकर नाका सुरू राहिला, तर किती वसुली होईल, याचा विचार करून कोल्हापूरच्या धर्तीवर चंद्रपूरकरांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
विसापूर, वरोरा येथेही टोलवसुली होणार
नागपूर-चंद्रपूर-बामणी या चौपदरी रस्त्यावर विसापूर व वरोरा येथे नवीन पथकर नाके सुरू होणार आहेत. सध्या त्याचे बांधकाम वेगात सुरू असून या दोन्ही नाक्यांवर किमान १५० रुपये पथकर आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवा आर्थिक भरुदड चंद्रपूरकरांना सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार ४० किलोमीटरच्या आत पथकर नसावा, परंतु येथे विसापूर ते ताडाळी २५ किलोमीटर व ताडाळी ते वरोरा २४ किलोमीटर, अशा अंतरानेच पथकर नाके राहणार आहेत, तसेच आज चंद्रपूर-नागपूर बसचे तिकीट १२० रुपये आहे. मात्र, स्वत:च्या वाहनाने गेले तर ३५० रुपये पथकर भरावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2014 8:59 am

Web Title: western maharashtra toll plaza at chandrapur
Next Stories
1 आदिवासीना नोकरीची हमी देणारा राज्यपालांचा आदेश धूळखात
2 सोलापूर-मुंबई विमानसेवेस उड्डाण मंत्रालयाची मान्यता
3 दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात सावधानतेचा इशारा
Just Now!
X