पश्चिम रेल्वेकडून प्रवेशबंदीचा फलक; वाढीवमधील नागरिकांच्या अडचणींत भर

निखील मेस्त्री, पालघर

वाढीव ग्रामस्थांना वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असलेल्या वैतरणा रेल्वेपूल क्रमांक-९२ वर रेल्वे प्रशासनाने हा सार्वजनिक रस्ता नाही, असा फलक लावून हा रस्ता सार्वजनिक नसल्याचे म्हटल्याने वाढीव ग्रामस्थांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

हा पूल सार्वजनिक नाही याचाच अर्थ या पुलावरून पायी प्रवास वा वाहतूक केल्यास संबंधित विरोधात कारवाईही असे स्पष्ट आहे. रेल्वे प्रशासनाने अचानक हा फलक लावल्याने वाढीववासीयांच्या समस्यांमध्ये आणखीन वाढ झाली आहे. या फलकाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वाढीव ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना या रेल्वे पुलावरून अनेक वर्षांपासून त्यांचा प्रवास सुरू होता, मात्र आता रेल्वे प्रशासनाने फलक लावून जबाबदारी झटकली आहे. रेल्वे प्रशासन येथील नागरिकांसाठी रेल्वे पुलालगत वा आता अस्तित्वात असलेल्या पुलावर पादचारी पूल बांधण्याची शक्यता नाही. अर्थात रेल्वे प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने आता जिल्हा प्रशासनाला वाढीव ग्रामस्थांसाठी रहदारी वा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करून जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

अनेक वर्षांपासून वाढीव ग्रामस्थ समस्येच्या गर्तेत असून समस्यांचा जणू पाढाच ते वाचत आहेत घरातील उदरनिर्वाहाच्या साधनांपासून ते सर्व जिनसा आणण्यासाठी त्यांना वैतरणा रेल्वे पुलाचा आधार घ्यावा लागतो अगदी घरातील गॅस सिलेंडर व पिण्याचे पाणीही डोक्या-खांद्यांवर वाहून आणावे लागत आहे रेल्वे रुळांवर टाकलेल्या लोखंडी पट्टय़ांवरून आपला जीव धोक्यात घालून येथील नागरिक हा जीवघेणा प्रवास दररोज करीत आहेत. जीव मुठीत घेऊन हा प्रवास करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्याचे येथील नागरिक महिला म्हणतात अनेक समस्यांनी ग्रासलेल्या वाढीव गावची लोकसंख्या २५०० इतकी आहे. गावात शिक्षण आरोग्य याची वानवाच आहे. गावातील नोकरदार, शेतकरी आणि विद्यार्थी यांना वैतरणा वा सफाळे स्थानकावर जाण्यासाठी रेल्वेने बनवलेल्या वैतरणा नदीवरील मुलाच्या रेल्वे रुळांमध्ये टाकलेल्या लोखंडी पट्टी यावरून प्रवास करावा लागत आहे.

गावात कोणती सुविधा नसल्याने या सर्व सुविधा गावाबाहेरून आणावे लागत आहेत. हे करीत असताना रहदारीसाठी मुलाशिवाय दुसरा कोणताच मार्ग या ग्रामस्थांकडे उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून वाढीव ग्रामस्थांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रशासनालाही करण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात कोणतेही प्रशासन याकडे लक्ष देत नाही हे आजवर ते करीत असलेल्या जीवघेण्या प्रवासाच्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे.

रेल्वे प्रशासनाने हा पूल सार्वजनिक नसल्याचे फलक लावून वाढीववासीयांचा प्रवासी व पायी रस्ताच बंद केला आहे. यापुढे या पुलावरून प्रवास केल्यास येथील नागरिकांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा स्थितीत वाढीव ग्रामस्थांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने हे फलक लावून वाढीववासीयांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाहतुकीचा मार्ग बंद केल्याने आता पुढील प्रवास करायचा कसा, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर पडला आहे. यामुळे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत वाढीवमधील ग्रामस्थांसाठी बोट सुरू करावी वा वाहतुकीसाठी तरी पर्यायी मार्ग सुरू करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

वैतरणा नदीवरील बांधलेल्या पुलाचा वापर सार्वजनिक नसून रुळाची दुरुस्ती-देखभाल करणाऱ्या अभियंते, कर्मचारी यांच्यासाठीचा आहे. गेल्या काही दिवसांत या पुलावर घडलेल्या दुर्घटना लक्षात घेता तेथील नागरिकांना सतर्कता म्हणून फलक लावले आहेत. राज्य शासनाने त्यांच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना वाहतूक व्यवस्था निर्माण करून द्यायला हवी.

– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

पिण्याचे पाणी, गॅस, जीवनावश्यक वस्तू, रुग्ण आदी या पुलावरूनच ने-आण करीत आहोत. एकंदरीत वाढीव गावाला चारही बाजूंनी समस्यांनी वेढले आहे. आरोग्याच्या समस्येवेळी मोठा प्रश्न निर्माण होतो. गर्भवतींना कावड करून पुलावरून दवाखान्यात न्यावे लागले. आता रेल्वे प्रशासनाने असे फलक लावल्यामुळे आम्ही जायचे कसे, हा यक्षप्रश्न आहे. आता तरी काही पर्याय काढा.

– महेश पाटील, वाढीव ग्रामस्थ