तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधणारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ज्यावर राष्ट्रवादीने निशाणा साधत, सावंत हे भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी निर्लज्ज समर्थन देत आहेत. कंत्राटदार आणि आमदारांना पाठिशी घालण्याचं काम तानाजी सावंत करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी नवाब मलिक यांनी केला आहे. निर्लज्ज समर्थन तानाजी सावंत यांनी केलं आहे असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

खेकड्यांचं कारण देऊन जलसंधारण मंत्री कंत्राटदाराला वाचवू पाहात आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आता हे सरकार महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणांवरचे खेकडे शोधणार का? असाही प्रश्न विजय वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती असे तानाजी सावंत यांनी म्हटले. ज्यानंतर आता त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टीका केली आहे.

चिपळूणमधलं तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारं हे वक्तव्य आहे यावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली आहे.