विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोण करीत आहे, यापेक्षाही कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. निवडणुका तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष बदलून उपयोग होणार नाही, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने आता विभागनिहाय आढावा घेण्याचे ठरविले आहे. मराठवाडय़ाची बैठक शुक्रवारी मुंबई येथे घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे टंचाई आढावा बैठकीसाठी कदम आले होते. नेतृत्व बदलाविषयी बोलताना ते म्हणाले की, दोन महिन्यांच्या ‘संधी’साठी मी धावपळ केली नाही. सध्या त्याची गरज नाही. निवडणुकीला सामोरे जाताना कोणती धोरणे आखावी, हे बघितले पाहिजे. काँग्रेस पक्षात कधी कोणाला संधी द्यायची, हे त्या-त्या वेळी ठरते. सध्या सुरू असणाऱ्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेबाबत बोलताना, आता बदल करून काय उपयोग? असे सगळे निर्णय दिल्लीत होतात. त्यामुळे त्याबाबत आम्हाला काही माहीत नसते. निर्णय घेण्याच्या वेळी एक ओळीचा ठराव केला जातो आणि हायकमांड निर्णय घेतात. अनेक मंत्रिपदे भूषविली असल्याचे सांगून ‘मी पूर्णत: समाधानी आहे’ असे कदम यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. पूर्वी एकदा कऱ्हाडला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हा पाच माणसेदेखील नव्हती. पण नंतर पक्ष सत्तेत आला. काही दिवसांपूर्वी भाजपचेही दोनच खासदार होते. आता तेही पूर्ण बहुमतात आहेत, असेही ते म्हणाले.
थोरातांचे धस यांना खडे बोल!
परभणीचे पालकमंत्री म्हणून महसूल राज्यमंत्री सुरेश धस टंचाई बैठकीत आक्रमकपणे मुद्दे मांडत होते. गारपीटग्रस्त भागातील शाळांचे पत्रे उडाल्याचा मुद्दा आला आणि तातडीने मदत केली जाईल, असे ते म्हणाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच बैठकीत होते. त्यांच्या आधीच निर्णय जाहीर करण्याची धस यांना घाई झाली होती, असे चित्र निर्माण झाल्याने कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले. परभणी जिल्ह्य़ातील अडीच कोटी रुपयांच्या मदतीवरून सुरू झालेला हा विषय महसूलमंत्री व राज्यमंत्र्यांमध्ये रंगला.