दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे. दरम्यान, जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर बंडा तात्या कराडकर यांनी स्वतः नोबेल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींच्या उपचाराकडे लक्ष देत आहे.

दरवर्षी आळंदी येथे पार पडणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरवरून संत नामदेव महाराजांची पालखीही असते. या पालखीत सुमारे दोन हजार वारकरी सहभागी होतात. यावर्षीदेखील ही पालखी सासवडहून पुणे येथे मुक्कामाला निघाली होती. त्यावेळी दिवे घाटात ही घटना घडल्याची माहिती बंडातात्या कराडकर यांनी दिली.

नामदेव महाराज यांची पालखी दिवे घाटातून पुढे निघून आली होती. त्याचवेळी उतारवरून येणारा जेसीबी दिंडीत घुसला. या घटनेत १५ ते २० वारकऱ्यांना गंभीर दुखापत झाली. यात दुर्देवानं संत नामदेव यांचे १७ वे वंशज सोपानकाका नामदास यांचा जागीच मृत्यू झाला. याव्यतिरिक्त अकोल्यातील जोग शिक्षण संस्थेतील मुलाचाही जागीच मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.

जेसीबीचे ब्रेक यापूर्वीच निकामी झाले होते. तसंच चालकाला वाहन उतरवू नये अशी विनंतीही करण्यात आली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी राहुल भीमराव बंडगर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. त्याच ठिकाणी हा काही अंतरावर हा जेसीबी होता. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला आम्ही उतारावरून वाहन आणू नका अशी विनंती केली होती. परंतु अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्यानं पहिले एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर काही वारकरी हे जेसीबी खाली आले. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले असल्याचेही ते म्हणाले.