19 January 2020

News Flash

‘अ‍ॅटलांटिक निनो’चा भारतीय मोसमी पावसावर परिणाम

अ‍ॅटलांटिक निनो म्हणजे काय

अ‍ॅटलांटिक सागरातील पृष्ठीय तापमानातील असंगतता व भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस यांचा संबंध आहे, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे भारतातील मोसमी पावसाचा अचूक अंदाज करण्यात मदत होणार आहे असे एका अभ्यासात म्हटले आहे.

अबुधाबी येथील भारतीय हवामान वैज्ञानिक अजय रवींद्रन यांनी म्हटले आहे की, भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस व अ‍ॅटलांटिक निनो म्हणजेच एझेडएम यांचा दुरान्वयाने संबंध आहे.  सेंटर फॉर प्रोटोटाइप मॉडेलिंग ऑफ न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी अबुधाबी (एनवाययुएडी) या संस्थेच्या या अभ्यासानुसार पूर्व उष्णकटीबंधीय अ‍ॅटलांटिक महासागरात जागतिक तापमानवाढीमुळे पृष्ठीय तापमानात नेहमी चढउतार होत असतात व काही वेळा सागराचे पृष्ठीय तापमान जास्त असते त्यावेळी एझेडएम म्हणजे अ‍ॅटलांटिक निनोशी संबंधित हवामान परिणाम दिसतात. त्यात पृथ्वीच्या विषुवृत्तीय वातावरणानजिक केल्विन तरंग तयार होतात. त्याचा परिणाम हिंदी महासागरात होत असतो. याचा अर्थ एझेडएम म्हणजे अ‍ॅटलांटिक निनोमुळे भारतीय मोसमी पावसावरही परिणाम होत असतो. एझेडएममधील थंड टप्पे हे मोसमी पावसाला अनुकूल असतात, तर जेव्हा तापमान वाढते तेव्हा मोसमी पाऊस कमी होऊ शकतो. जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतीय मोसमी पावसाबाबत अधिक अचूक अंदाज करता येऊ शकतात, असा दावा रवींद्रन यांनी केला आहे.

अ‍ॅटलांटिक निनो म्हणजे काय

अ‍ॅटलांटिक निनो हा सागरी जलाच्या पृष्ठीय तापमानाशी संबंधित परिणाम आहे. त्यात अ‍ॅटलांटिक महासागरातील पाणी कधी गरम, कधी थंड होते. या तापमानातील चढउतारांमुळे आफ्रिकेतील वातावरणावर परिणाम होतो असे आतापर्यंत स्पष्ट झालेले असले तरी भारतातील मोसमी पावसावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नव्याने दिसून आले आहे. अ‍ॅटलांटिकमधील या परिणामाला अ‍ॅटलांटिक झोनल मोड म्हणजे एझेडएम किंवा अ‍ॅटलांटिक निनो असे म्हटले जाते. जर अ‍ॅटलांटिकमधील पाण्याचे तापमान कमी असेल तर ते भारतातील मोसमी पावसास अनुकूल असते तर वाढते तापमान हे धोकादायक असते.

 

First Published on May 20, 2019 12:27 am

Web Title: what is atlantic equatorial mode
Next Stories
1 फुलोऱ्याच्या वेळापत्रकाची देशात पहिल्यांदाच निर्मिती
2 आळंदीत सराईत गुन्हेगारावर भर दिवसा जीवघेणा हल्ला;घटनेत सराईत गंभीर जखमी
3 उन्हापासून वाचण्यासाठी पुणेकराची अनोखी शक्कल, सिग्नलवर तयार केले कापडी छत
Just Now!
X