मराठा आरक्षण शरद पवारांमुळे मिळालं नाही असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न विचारुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उदयनराजेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणावरुन भाजपाचं पडद्यामागचं राजकारण सुरु आहे असाही आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असतं मात्र शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांचा त्यावर अभ्यास नाही त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत आहेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

९ डिसेंबरला मराठा आरक्षणाला सप्टेंबर महिन्यात मिळालेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यास सुरुवात केली. याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता भाजपा मराठा आरक्षण प्रश्न पडद्याआडून राजकारण करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. २५ जानेवारीपासून या प्रश्नी सुनावणी सुरु होईल. मराठा आरक्षण प्रश्नावरुन आता भाजपाकडून टीका होऊ लागली आहे. असं असलं तरीही छगन भुजबळ यांनी भाजपा या प्रश्नी पडद्याआडून राजकारण करते आहे असा आरोप केला आहे. ज्या पक्षाच्या खासदारांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली त्यातून भाजपाचा हेतू काय ते उघड होतं असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.