“करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे,” या आपल्या विधानामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरातून सीतारामन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व? अशा शब्दांत त्यांनी सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.

राऊत म्हणाले, नोटाबंदी ते लॉकडाउन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था मरुन पडली आहे. मात्र, याचं खापर सीतारामन यांनी थेट देवावरच फोडलं. त्यामुळं सरकार यात काय करणार? अशी भूमिका मांडणारं हे सरकार टोकाचं देवभोळं आणि धर्माधिष्ठित असल्याचा हा परिणाम आहे. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. कारण, देवानचं करोनाचं संकट आणलं असेल तर देवच करोनाग्रस्तांना बरं करेल मग आपण लस तरी का शोधायची? असा सवाल करताना भारताच्या अर्थमंत्र्यांचं हे विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्या देशाला शोभणारं नाही, अशा शब्दांत त्यांनी सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.

अर्थमंत्री की जादूटोणावाले?

सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडताना राऊत यांनी देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीनच्या कारवाया देखील देवाचीच करणी आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. ‘राजा तशी प्रजा’ या म्हणीचा संदर्भ देताना बिहारमध्ये करोना देवीचं मंदिर उभारल्याचा आणि महाराष्ट्रात बार्शीत करोना देवीची स्थापना झाल्याचा दाखला त्यांनी दिला. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत करोना देवीची स्थापना करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झाला तसाच गुन्हा निर्मला सीतारामन यांच्यावर का दाखल व्हायला नको असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, लॉकडाउनमुळे रोजगार गेलेल्या जनतेला ब्राझिल सरकारने जी मदत केली त्याची आठवण यावेळी संजय राउत यांनी केंद्र सरकारला करुन दिली. ब्राझिलच्या सरकारने कोविडच्या काळात आपल्या नागरिकांना मदत म्हणून थेट बँकेत रक्कम हस्तांतरीत केली. त्याप्रमाणे आपल्या सरकारंनही काम करणं अपेक्षित असून ही देवाची करणी वैगरे नसून माणसांवर आलेलं संकट आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक आधार देणे हे सरकारचे काम असल्याचं ते म्हणाले.

करोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचं खापर कोणावर फोडणार? असा सवाल करीत राऊत म्हणाले, अर्थव्यवस्थेची पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचं मातेरं करुन त्याचं खापर देवावर फोडणं हा मानसिक गोंधळ आहे. कायद्याच्या भाषेतील ‘अॅक्ट ऑफ गॉड’ समजून घ्या असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. त्याचबरोबर देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांची श्रीमंत वाढली, ही पण देवाचीच करणी आहे का? असा सवाल त्यांनी सीतारामन यांना विचारला.