08 July 2020

News Flash

३४ हजार कोटींची कर्जमाफी स्वागतार्ह! पण पुरेशी नाही-शरद पवार

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या तर शेतकरी स्वयंपूर्ण होईल

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ३४ हजार कोटींची कर्जमाफी पुरेशी नाही, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी उचललेले कर्जमाफीचे पाऊल स्वागतार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जमाफी हे एक महत्त्वाचे पाऊल होते. ते सरकारने उचलले, आता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्यासाठी येत्या काळात आम्ही आग्रही राहणार आहोत, तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी थकबाकीदार का होतात हे सरकारने शोधावे

शेतकरी थकबाकीदार का होत आहेत? हे शोधणे सरकारचे काम आहे. निवडणुका जिंकण्यापूर्वी भाजपने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या लागू झाल्या तर शेतकरी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होईल. तसेच कर्जमाफीचा बोजा हा सामान्य माणसांवर पडणार नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. सरकारने कृषीमूल्य आयोगाची नेमणूक करण्याची मागणीही शरद पवारांनी केली आहे. ग्रामिण सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे २ हजार कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्या जमा करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राज्य सरकारने लवकरात लवकर राबवली पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

वाढत्या दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची गरज

काश्मीरमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात अंतर्गत सुरक्षा वाढवली पाहिजे आणि दहशतवादाविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. दररोज सीमेवर जवान मारले जात आहेत. त्याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तानसोबत युद्ध करावे अशी माझी भूमिका नाही, मात्र वाढत्या दहशतवादावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

माझ्या वक्तव्याला ऐतिहासिक आधार
‘शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते’ हे वक्तव्य शरद पवारांनीच काही दिवसांपूर्वी पुण्यात केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला होता, तसेच सोशल मीडियावरही शरद पवारांच्या या वक्तव्याचा अनेक नेटिझन्सनी समाचार घेतला होता. याबाबत विचारले असता, मी आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्यांनी माझ्यावर जातीयवादाचा आरोप केला त्यांच्या मनात माझ्याविषयी खदखद आहे, म्हणून ते असे आरोप करत आहेत, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांबद्दल मी जे बोललो ते ऐतिहासिक आधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

..तर तुम्हाला भेटता आले नसते

राष्ट्रपतीपदाबाबतही शरद पवारांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. मी सुरूवातीपासूनच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इच्छुक नव्हतो. राष्ट्रपती झालो असतो तर तुम्हाला भेटता आले नसते. तसेच रामनाथ कोविंद यांच्या विरोधात विरोधकांनी मीरा कुमार यांची केलेली निवड योग्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2017 3:37 pm

Web Title: what sharad pawar say on farmers loan waiver
Next Stories
1 …तर या सरकारचे काय करायचे ते आम्ही बघू: उद्धव ठाकरे
2 कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय
3 कोकणात पायाभूत सुविधांची कामे सुरू – मुख्यमंत्री
Just Now!
X