आताच्या दुष्काळात राज्यात अनेक भागांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत आणि टंचाईमुळे वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश अशी स्थिती एकीकडे असतानाच दुसरीकडे कोयना धरणात उलट स्थिती आहे. ३१ जुलैपर्यंतच्या सर्व गरजा भागवूनही या धरणात पुढील पावसाळा सुरू झाल्यानंतरही तब्बल ८.५ ते १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी दुष्काळी भागाला पुरविण्याची व्यवहार्य व्यवस्था नसल्याने ते वापराविना तसेच पडून राहणार आहे.
कोयना धरण मुख्यत: वीजनिर्मिती आणि शेतीसाठी बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्यातून वर्षांला ६७.५ टीएमसी पाणी पश्चिमेला कोकणात वळवून वीजनिर्मिती केली जाते. तसेच काही पाणी कोयना व कृष्णा नद्यांतून पूर्वेकडे शेतीसाठी पुरविले जाते. त्यातूनच म्हैसाळ, ताकारी, टेंभू या दुष्काळी भागांसाठी पाणी पुरवले जाते. कोयना धरणात सोमवारी ४६.५५ टीएमसी पाणीसाठा होता. या धरणाचे वीजनिर्मितीचे सर्व चारही टप्पे व्यवस्थित कार्यान्वित राहण्यासाठी धरणात १० टीएमसी पाणीसाठा असावा लागतो. त्यामुळे उरलेले ३६.५ टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. अगदी जुलै अखेपर्यंतचा विचार केला तरी वीजनिर्मितीसाठी प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त सहा टीएमसी पाणी वापरता येते. मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी असे १८ टीएमसी पाणी वापरले जाईल. बाष्पीभवनाचा व्यय एक टीएमसी होईल. त्यामुळे पूर्वेकडे वळवण्यासाठी १७.५ टीएमसी पाणी उपलब्ध असेल. पूर्वेकडील पाण्याची गरज महिन्याला जास्तीत जास्त ३ टीएमसी आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत आणखी ८ ते ९ टीएमसी पाणी त्यावर जाईल. त्यामुळे कोयना धरणात ३१ जुलैपर्यंत पाऊस पडला नाही तरी तब्बल ८.५ ते १० टीएमसी पाणी वापराविना शिल्लक असेल.
प्रत्यक्षात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यातच पाऊस सुरू होतो आणि धरणात पाणी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत धरणात पाणी न येणे, असे होतच नाही. हा कोयना धरणाचा इतिहास आहे. याबाबत कोयनेसह राज्यातील सर्व जलविद्युत प्रकल्पांचे मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी सांगितले की, कोयनेतून पूर्वेकडे सोडण्यास तब्बल १८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते मागणीनुसार सोडता येऊ शकेल. या वर्षी इतके पाणी शिल्लक असले तरी बऱ्याचदा या धरणात असे तब्बल २५ टीएमसीपर्यंत पाणी शिल्लक असते.