जाती पातींवरून जे राजकारण चाललंय ते अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाज रस्त्यावर उतरला तर काय होईल याचा तरी विचार करावा अशी भीती व्यक्त केली आहे. आपण जात पात मानत नसून सगळ्यांनी एकोप्यानं रहावं असं आवाहन करताना महार किंवा अन्य जाती यांनी आपली लोकसंख्या किती आहे आदीचाही विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयन राजे भोसले म्हणाले की शिवाजी महाराज व संभाजी महाराज या अत्यंत थोर व्यक्ती होत्या, त्यांच्या समोर आपल्या सगळ्यांची काय लायकी आहे? त्यामुळे सगळ्यांनी संयम राखावा आणि समाजात फूट पाडणाऱ्या गोष्टी करू नयेत असं त्यांनी सांगितले.

मूठभर राजकारणी व बडे नेते त्या त्या समाजातील लोकांना भडकावत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला आहे. सध्या महार विरुद्ध मराठे असं वातावरण पेटवलं जात आहे. मात्र, किमान याचा तरी विचार करायला हवा की ३५ टक्के असलेले मराठा रस्त्यावर उतरले तर किती गंभीर स्थिती होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

समाजात आपसात असलेला संघर्ष चुकीचा असल्याचे सांगताना, ग्रामीण विरुद्ध शहरी असाही संघर्ष पेटू शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचं या सगळ्यात हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.

शिवाजी महाराजांनी मुस्लीमांसह सगळ्या समाजातील लोकांना बरोबर घेतल्याचा दाखला देत आपणही सर्वांनी आपसातले मतभेद बाजुला ठेवू न एकत्र रहायला हवं. उद्रेक करणारी भाषणबाजी टाळायला हवी आणि समाजात फूट पडणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.